अमेरिकेने चीनला सुनावले : भारतात होणार शिखर परिषदेचे आयोजन
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी भारतात होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेपासून अंतर राखले आहे. याप्रकरणी आता अमेरिकेकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. अमेरिकेने चीनला जी-20 शिखर परिषदेला बिघडवू पाहणारा देश संबोधिले आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी याप्रकरणी भूमिका मांडली आहे.

2021 मध्ये कोरोना निर्बंधांमुळे जिनपिंग हे जी-20 शिखर परिषदेपासून दूर राहिले होते. परंतु त्यांनी व्हिडिओ लिंकद्वारे यात भाग घेतला होता. या पार्श्वभूमीवर चीनचे अध्यक्ष झाल्यापासून जिनपिंग हे पहिल्यांदाच या परिषदेत सहभागी होणार नाहीत. चीनमधील आर्थिक स्थिती आणि भारतासोबत सुरू असलेल्या तणावामुळे जिनपिंग यांनी हा निर्णय घेतला असल्याचे मानले जात आहे.
चीन-भारत संबंधांच्या पार्श्वभूमीवर जी-20 वर पडणाऱ्या प्रभावाबद्दल सुलिवन यांनी वक्तव्य केले आहे. भारत आणि चीनच्या संबंधांमधील तणावाचा परिषदेवर पडणाऱ्या प्रभावाबद्दल बोलायचे झाल्यास वातावरण बिघडविणारे काम करायचे की नाही हे चीननेच ठरवावे. चीनने जी-20 मध्ये सृजनात्मक भूमिका पार पाडावी, परिषद बिघडविण्याचा प्रयत्न करू नये असे सुलिवन यांनी ड्रॅगनला सुनावले आहे.
जी-20 परिषदेचा अध्यक्ष म्हणून भारत हवामान बदलावर बहुपक्षीय परंतु सृजनात्मक पद्धतीने सामोरे जाण्यास प्रत्येक सदस्य देशाप्रमाणे प्रोत्सहित करणार आहे. विकसनशील देशांच्या समस्येवरील उपाय अन् वितरणावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी भूराजकीय प्रश्न बाजूला सारण्याची गरज असल्याचे सुलिवन यांनी चीनला उद्देशून म्हटले आहे.
बिडेन यांच्याकडून निराशा व्यक्त
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन देखील जिनपिंग हे परिषदेत सामील होणार नसल्याने निराश आहेत. जिनपिंग यांच्यानंतर चीनमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे नेते असलेले पंतप्रधान ली कियांग हे नवी दिल्लीत होणाऱ्या जी-20 परिषदेत प्रतिनिधित्व करणार आहेत. चीनची अर्थव्यवस्था सध्या सर्वात मोठ्या संकटाला सामोरे जात असल्याचे माले जाते. कियांग यांना परिषदेसाठी पाठवून जिनपिंग हे स्वत:चे अपयश झाकू पाहण्याचा प्रयत्न करत आहेत. चीनची अर्थव्यवस्था आणि तेथील संकटाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर कितपत प्रभाव पडणार याची चर्चा जी-20 शिखर परिषदेत होणार आहे. याचमुळे जिनपिंग यांनी पंतप्रधान ली कियांग यांना भारत दौऱ्यावर पाठविण्याचा निर्णय घेतला असावा.
चीनचा कांगावा
जी-20 शिखर परिषदेच्या आयोजनासाठी भारताचे समर्थन केल्याचा दावा चीनने मंगळवारी केला आहे. जी-20 समुहाला आम्ही नेहमीच उच्च महत्त्व देतो आणि प्रासंगिक घडामोडींमध्ये सक्रीय स्वरुपात भाग घेतो. जी-20 आंतरराष्ट्रीय सहकार्याचे प्रमुख व्यासपीठ आहे. चीन-भारत संबंध सध्या स्थिर असून दोन्ही देशांनी विविध स्तरांवर चर्चा अन् संपर्क कायम ठेवल्याचे चीनच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडून म्हटले गेले आहे.









