ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारला आग्रह
वृत्तसंस्था / कोलकाता
बांगला देशातील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती पूर्णत: हाताबाहेर गेली असून भारताने त्वरित या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे. भारताने या स्थितीसंबंधी संयुक्त राष्ट्रसंघात आवाज उठवावा आणि संयुक्त राष्ट्रसंघाची शांतीसेना बांगला देशात नियुक्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
बांगला देशात हिंदूंवर तेथील इस्लामी धर्मांधांकडून अत्याचार केले जात आहेत. नुकतीच तेथे इस्कॉन या संस्थेचे माजी प्रमुख चिन्मोय कृष्ण दास यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर बांगला देश पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा नोंद केला आहे. त्यांच्या जीवाला धोका करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप त्या देशातील अनेक हिंदू नेत्यांनी केला आहे. भारतानेही या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली असून बांगला देशाला हिंदूंच्या संरक्षणाची सूचना केली आहे.
ममता बॅनर्जींचे भाषण
पश्चिम बंगाल विधानसभेच्या शीतकालीन अधिवेशनात त्या राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हा विषय मांडला आहे. बांगला देशातील स्थितीविषयी केंद्र सरकारने संयुक्त राष्ट्रसंघाला अवगत करावे. तसेच त्या देशात संयुक्त राष्ट्रसंघाची शांतीसेना नियुक्त केली जाईल, अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न करावा. शांतीसेना नियुक्त झाल्यास तेथील अल्पसंख्याकांना संरक्षण मिळण्याची शक्यता आहे, असे प्रतिपादन ममता बॅनर्जी यांनी सोमवारी त्यांच्या विधानसभेतील भाषणात केले.
केंद्र सरकारचे समर्थन
बांगला देशाशी पश्चिम बंगालचे घनिष्ट संबंध आहेत. तेथे आमच्या राज्यातील लोकांची मालमत्ता आहे. आमच्या लोकांचे नातेवाईक तेथे आहेत. त्यामुळे तेथील परिस्थितीसंबंधी आम्हाला चिंता वाटत आहे. या संदर्भात केंद्र सरकार जी पावले उचलेल त्यांचे आमच्याकडून समर्थन केले जाईल, असे बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. तेथील परिस्थितीसंदर्भात माझी कोलकाता येथील इस्कॉन प्रमुखांची चर्चा झाली असून आमचे पूर्ण समर्थन त्यांना असल्याचा संदेश त्यांना देण्यात आला आहे. या संदर्भात केंद्र सरकारलाही आम्ही पूर्ण सहकार्य करु, असे प्रतिपादन त्यांनी केले.
भाजपची जोरदार टीका
ममता बॅनर्जी बांगला देशातील हिंदूना सहानुभूती दाखवितात हे त्यांचे एक नाटक आहे. पश्चिम बंगालमध्ये हिंदूंची अवस्था बॅनर्जी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात कशी झाली आहे, याकडे त्यांनी जरा लक्ष द्यावे. त्या बांगला देशातील हिंदूंच्या परिस्थितीवर नक्राश्रू ढाळत आहेत, ही त्यांची केवळ दांभिकता आहे, अशी टीका पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केली आहे.
ममता बॅनर्जी हिंदूद्वेषी
आज बांगला देशवर टीका करणाऱ्या ममता बॅनर्जी या स्वत: हिंदुद्वेष्ट्या आहेत. त्यामुळे त्यांनी बांगला देशातील हिंदूंना खोटी सहानुभूती दाखवू नये. ममता बॅनर्जी यांनी स्वत: काही काळापूर्वी रामकृष्ण मिशन, भारत सेवाश्रम संघ आणि इस्कॉन या पश्चिम बंगालमधील हिंदू धार्मिक संघटनांना लक्ष्य केले होते. आपली मुस्लीम मतपेढी सुरक्षित ठेवण्यासाठी त्या नेहमीच राज्यातील हिंदू सामाजिक आणि धार्मिक संघटनांची मुस्कटदाबी करत असतात, अशीही टीका या पक्षाने केली आहे.
भारतात जाणाऱ्यांना आडविले
इस्कॉन संस्थेच्या 68 नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना बांगला देश सरकारने भारतात जाण्यापासून रोखले आहे. हे नेते आणि कार्यकर्ते भारतात एका कार्यक्रमासाठी येणार होते. मात्र, त्यांना विमानतळांवर आणि भारत-बांगला देश सीमेवर आडविण्यात आले आहे, अशी माहिती बांगला देश पोलिसांनी सोमवारी दिली.









