कोल्हापूर :
नवीन शैक्षणिक धोरण लागू झाल्याने शिवाजी विद्यापीठ अंतर्गत 299 महाविद्यालयात तासिका तत्वावर (सीएचबी) कार्यरत प्राध्यापकांना तासी 900 रूपये मानधन देणे बंधनकारक आहे. त्यामुळे काही प्राध्यापकांना 900 नुसार तर काहींना 720 रूपयांनी मानधन देले. या मानधनातून घरसंसार चालत नसल्याने जोड व्यवसाय केल्याशिवाय पर्याय नसल्याचे सीएचबी प्राध्यापकांचे म्हणने आहे. परंतू अलिकडे मानधन वेळेत मिळत असल्याने सीएचबी प्राध्यापकांकडून समाधान व्यक्त होत आहे. असे असले तरी राज्य शासनाने मानधनात वाढ करून किमान दरमहा 50 हजार रूपये मानधन द्यावे, अशी मागणी सीएचबी प्राध्यापकांकडून पुढे येत आहे.
सीएचबी प्राध्यापकांचे नियमित प्राध्यापकांच्या बरोबरीने काम असले तरी मानधन मात्र फारच कमी आहे. त्यातही मानधन वेळेत न दिल्याने आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागतो. पुर्वी जास्त मानधन मिळावे म्हणून एकाचवेळी अनेक कॉलेजवर सीएचबी प्राध्यापक अध्यापनाचे काम करीत. तरीही सहा महिने ते वर्षभर मानधनापासून वंचित राहावे लागायचे. गेल्या तीन वर्षापासून सीएचबी प्राध्यापकाने एकाच कॉलेजवर अध्यापन करावे, असा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला. त्यानंतर मानधनात वाढ केल्याचे जाहीर करून महिन्याला सीएचबी प्राध्यापकांच्या बँक खात्यात मानधन जमा करण्याचे कबुल केले. तरीही बहुतांश महाविद्यालय नियमित प्राध्यापकांच्या पगारपत्रकाबरोबर सीएचबीचे पगारपत्रक पाठवत नाहीत. तसेच 60 मिनिटांचा तास असूनही 45 मिनिटाचेच मानधन सीएचबी प्राध्यापकांना देत होते. त्यामुळे तासी 900 ऐवजी 720 रूपये प्राध्यापकांना मिळायचे. परंतू डॉ. धनराज नाकाडे यांनी उच्च व तंत्र शिक्षण सहसंचालक पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर पहिल्यांदा सीएचबी प्राध्यापकांचे मानधनात 900 रूपये प्रमाणे देवून, नियमित प्राध्यापकांच्या पगारपत्रकाबरोबर त्यांचेही मानधन पत्रक पाठवण्याचे आदेश महाविद्यालयांना दिले. आदेशाचे पालन न करणाऱ्या महाविद्यालयावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला. परिणामी सध्या सीएचबी प्राध्यापकांना दर दोन महिन्यांनी मानधन मिळत असल्याने सीएचबी प्राध्यापक संघटनेकडून सहसंचालकांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त होत आहे. परंतू अद्याप काही प्राध्यापकांना 720 प्रमाणे मानधन मिळत आहे. त्यामुळे सहसंचालकांनी लक्ष घालून 900 प्रमाणे माधन देण्याची मागणी सीएचबी प्राध्यापकांकडून होत आहे.
राज्य शासनाने 2018 मध्ये 2088 जागांसाठी प्राध्यापक भरती सुरू केली. परंतू अद्याप यातील बहुतांश जागा भरलेल्या नाहीत. दहा–बारा वर्षानंतर शासनाने नोकरभरती जाहीर केली परंतू कुलपतींनी स्थिगिती दिल्याने सीएचबी प्राध्यापकांच्या पदरी निराशाच आली. नियमित प्राध्यापकांच्याबरोबरीने काम करूनही मानधन मात्र फारच कमी दिले जाते. तसेच सीएचबी प्राध्यापकांकडून तासा व्यतिरिक्त एनएसएस, एनसीसी, विविध स्पर्धा, नॅक मूल्यांकनाचे कामदेखील करून घेतले जाते. याशिवाय परीक्षेची सर्व गोपनीय कामेदेखील करून घेतली जातात. ऐवढे करूनही नियमित प्राध्यापकांपेक्षा कमी मानधन मिळते. याचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही होत आहे. संसाराचा गाडा पुढे न्यायचा म्हंटले तर अध्यापनाबरोबर इतर काम केल्याशिवाय पर्याय नाही. कारण मिळणाऱ्या मानधनात मुलांना चांगले शिक्षण देणेसुध्दा जमत नसल्याच्या तक्रारी सीएचबी प्राध्यापकांच्या आहेत.
सीएचबी प्राध्यापकांना नियमित प्राध्यापकांप्रमाणेच वर्कलोड.
काही कॉलेजमधील सीएचबी प्राध्यापकांना 900 नुसार मानधन दिले जाते.
उशिरा मान्यता मिळालेल्या सीएचबी प्राध्यापकांना जुलै–ऑगस्ट सप्टेंबरपर्यंतचे मानधन 720 नुसार तर ऑक्टोबर व नोव्हेंबरचे मानधन 900 नुसार दिले.
27 मार्च 2023 आदेशानुसार तास भरल्यास 900 रूपयेने मानधन देणे आवश्यक.
महिन्याला सर्वसाधारण 25 हजार रूपये मानधन मिळते, त्यात वाढ करून 50 हजार रूपये करण्याची मागणी.
विद्यापीठ परिक्षेत्रातील 30 ते 40 कॉलेजमधील प्राध्यापकांना 720 प्रमाणे मानधनाचा फटका.
युजीसीच्या सूचनांची राज्य शासनाने अंमलबजावणी करावी
युजीसीने तासाला 1500 व महिन्याला 50 हजार मानधन देण्यात यावे अशा सूचना राज्य शासनाला केल्या आहेत. या सूचनांची राज्य शासनाने अंमलबजावणी करावी. तसेच सीएचबी प्राध्यापकांचे मानधन दर महिन्याला देण्यात यावे.
नितीन घोपे (राज्य समन्वयक, सीएचबी प्राध्यापक)








