महसूल वाढीसाठी प्रयत्न, ई-टेंडरद्वारे मागविल्या निविदा
बेळगाव : महसूल वाढीसाठी कॅन्टोन्मेंट बोर्डकडून खुल्या जागांवर पार्किंग तळ उभारले जात आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात कॅन्टोन्मेंटच्या जागा असल्यामुळे त्या ठिकाणी पे अँड पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. काही जागांसाठी ई-टेंडरींगच्या माध्यमातून निविदा मागविण्यात आल्या आहेत. कॅन्टोन्मेंड बोर्डने कॅटल मार्केट, आरटीओ रोड, कलादगी रोड, नॉर्थ टेलिग्राफ रोड, कॅन्टोन्मेंट बोर्ड ऑफिस, पोस्ट ऑफिस रोड, रेल्वेस्टेशन, रेल्वे बसस्टँड या परिसरात पे अँड पार्क सुरू केले आहे. मागील काही दिवसांपासून या सेवा सुरू होत्या. आता पुन्हा एकदा या परिसरात पे पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.
5 जूनपर्यंत अर्जाचे आवाहन
कॅन्टोन्मेंट बोर्डचा खर्च अधिक आणि महसूल कमी अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे महसूल वाढीसाठी मागील काही महिन्यांपासून कॅन्टोन्मेंट बोर्डचे प्रयत्न सुरू आहेत. खुल्या जागांवर पार्किंगची व्यवस्था तसेच इतर जागा करार पद्धतीने देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ई-टेंडरिंग करून इच्छुक कंत्राटदारांना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. 5 जूनपर्यंत वेबसाईटवर जाऊन कंत्राटदार अर्ज दाखल करू शकतात.









