कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. त्याचबरोबर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली व पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागा अशा दोन जागांची निवडणूक लवकरच अपेक्षीत आहे. 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वजनिक निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीत मोठी खेळी खेळण्यासाठी शरद पवारांचा आटापीटा सुरु आहे. भाजपा विरोधकांना एकत्रित आणण्यासाठी त्यांच्या उठाबशा सुरू आहेत. त्यांच्या प्रयत्नांना कितपत यश येते आणि याविरोधी आघाडीचे नेतृत्व कोणाकडे येते यावर बरेच अवलंबून आहे. तथापि, महत्वाकांक्षी नेते आणि त्यांचे गटतट पाहता पवार करीत असलेला आटापीटा कितपत परिणामकारक होईल हे सांगणे आज घडीला कठीण आहे. कर्नाटकात विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. आचारसंहिता व निवडणूक तारखा यांची घोषणा झाली आहे. कर्नाटक विधानसभेची ही निवडणूक सेमीफायनल मानली जाते आहे. कर्नाटकातून जे प्राथमिक सूर ऐकू येत आहेत किंवा अंदाज व्यक्त होत आहेत त्यानुसार भाजप तेथे स्वबळावर येण्याची शक्यता अल्प आहे. तेथे मतविभागणी टाळली तर भाजपची स्थिती आणखी अवघड होणार आहे व देशभर वेगळा मेसेज जाणार आहे. राजकीय सल्लागार आणि व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांनी भाजपाला रोखण्यासाठी शरद पवारांना जे मंत्र दिले आहेत त्यानुसार भाजपाला महाराष्ट्रात आणि देशात हरवणे शक्य आहे. पण त्यासाठी विरोधी मतांचे एकत्रीकरण गरजेचे आहे. प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते व आपली सल्लागार संस्था बंद करणार होते पण तो बेत मागे पडला आहे. आगामी काळात ते अॅक्टिव्ह राहणार आहेत. पण, कोठेही आपला उमेदवार देणार नाहीत. महाराष्ट्रात त्यांनी उद्धव ठाकरे यांना गतनिवडणुकीत सल्ला दिला होता. ठाकरे मुख्यमंत्री झाले. ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद, महाविकास आघाडीची निर्मिती आणि पवारांचे पावसातील भाषण यांचा बोलबाला असला तरी त्यामागे प्रशांत किशोर यांची व्यूहरचना होती. गेली तीन चार वर्षे शरद पवार हे प्रशांत किशोर यांच्या संपर्कात आहेत. त्यांनी किशोर यांच्या समवेत बैठका केल्या आहेत. मुंबईतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत त्यांनी प्रेझेंटेशन, सल्लामसलत केली होती आणि नरेंद्र मोदी व भाजपा यांना रोखता येऊ शकते असा विश्वास दिला होता. नुकताच न्यायालयाने दिलेला निवाडा व राहुल गांधी यांची रद्द झालेली खासदारकी व त्यांच्यावर निवडणुकीस उभे राहण्यासाठी आलेले निर्बंध पाहता पंतप्रधानपदाच्या शर्यतीत राहुल गांधी असणार नाहीत हे वेगळे सांगायला नको. राहुल गांधींच्यावरील या कारवाईमुळे शरद पवार यांच्या त्यांच्या पंतप्रधानपदाच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे. पवार आणि महाविकास आघाडीने पुण्यातील कसब्यात जो प्रयोग केला तो देशभर केला तर भाजप विरोधी सर्व मते एकगठ्ठा होतील व भाजपला रोखता येईल असा विश्वास या मंडळींना आला आहे. तुलनेने भाजपा अजून हवेतच आहे. विद्यमान लोकसभेत भाजपाने अपेक्षेपेक्षा अधिक जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळविले आणि तीन तलाक, रामजन्मभूमी मुक्ती व मंदिर उभारणी, घटनेचे 370वे कलम रद्द वगैरे निर्णय घेतले पण भाजपाला आपला मताचा टक्का वाढवता आलेला नाही आणि भाजपाचे तगडे मित्र भाजपापासून दुरावले आहेत. गेल्या लोकसभेला उरीचा हल्ला व सर्जिकल स्ट्राईकचे वारे होते. तेव्हा भाजपाच्या मताची टक्केवारी 38 वर गेली होती. स्पष्ट बहुमत मिळाले पण भाजपाविरोधात 62 टक्के मतदार होते. ती विभाजीत मते एकत्र करणे हाच प्रशांत किशोर यांचा सल्ला आहे आणि त्यासाठी शरद पवार व मंडळी प्रयत्न करीत आहेत. नुकतीच पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी विरोधकांची बैठक झाली. विरोधकांनी देशात लोकशाही अडचणीत आहे आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा विरोधकांना संपविण्यासाठी वापर केला जातो आहे वगैरे आरोप केले. मतदान यंत्राद्वारे नको बॅलेटद्वारे करा अशीही मागणी या बैठकीत लावून धरली.पण या व अशा बैठकांचे मुख्य सूत्र ही 62 टक्के मते एकत्रित करणे व भाजपाविरोधात एकास एक उमेदवार देणे हेच होते. राहुल गांधींनी सावरकर यांची माफीवीर अशी हेटाळणी सतत सुरु ठेवल्याने अनेकांना धक्का बसला आहे व शिवसेना नाराज आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार, रजनी पाटील वगैरेंनी काँग्रेस नेतृत्वाला हा विषय बंद करा असे सुनावले आहे व आता राहुल गांधींनी आपली मुक्ताफळे थांबवतो असे भाजपा विरोधकांना आश्वस्त केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महाआघाडीचा प्रयोग देशपातळीवर करण्याचा पवारांचा प्रयत्न मार्गी लागला आहे. काँग्रेस, आप, सीपीआय, सीपीएम, शिवसेना-उद्धव ठाकरे गट, तृणमूल काँग्रेस, आरजेडी, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पंधरा पक्षांचे नेते एकत्र येताना दिसत आहेत पण अनेक ठिकाणी राज्य पातळीवर या पंधरा पक्षातही टोकाचा विरोध आहे. विशेष करुन आप आणि काँग्रेस पंजाबमध्ये आमने सामने आहेत. दिल्लीतही तीच स्थिती आहे. त्यामुळे 62 टक्के मतांचे एकत्रीकरण व पंतप्रधानपदाचा विरोधकांचा चेहरा ही सोपी गोष्ट नाही. ममता बॅनर्जी, नितीश कुमार, शरद पवार, प्रियांका गांधी अशी अनेक नावे पुढे येऊ शकतात. केवळ मोदी विरोध या मुद्द्यावर संघटन झाले तरी कार्यक्रम नसेल आणि सत्तारूढ मंडळींमध्ये परस्पर विरोध असेल तर काय होते हे महाराष्ट्रात दिसून आले आहे. पण पवार चार्ज झाले आहेत. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा व त्यांना न्यायालयाने दिलेली शिक्षा यामुळे सहानुभूती निर्माण करता येईल असाही मनसुबा दिसतो आहे. म्हणून पवार सरसावले आहेत. संजय राऊत, प्रफुल्ल पटेल वगैरे त्यांचे सेनापती या कामात लहानमोठ्या मोहिमा राबवत आहेत. मोदी व भाजपा शांत आहेत. पण त्यांनीही या गोष्टीचा विचार करुन योजना आखली असणारच. तुर्त कर्नाटकचा कौल कुणाला मिळतो तेथे त्रिशंकू अवस्था होते की भाजपाविरोधक एकत्र येतात हे बघावे लागेल. पवारांना पंतप्रधानपदाची खुर्ची पुन्हा खुणावू लागली आहे. प्रशांत किशोर यांनी दिलेल्या टिप्स, 62 टक्के मतांचे एकत्रीकरण आणि भाजपाविरोधी एकास एक उमेदवार यासाठी त्यांनी बोलणी सुरु केली आहेत. पवार अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी आटापीटा आरंभला आहे.
Previous Articleमनदीप जेंग्राचा चौथा विजय
Next Article मियामी टेनिस स्पर्धेत क्विटोव्हा विजेती
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








