राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा शरद पवार यांचा निर्णय म्हणजे धक्कातंत्राच्या राजकारणाचाच भाग म्हटला पाहिजे. मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भूमिकेमुळे काहीशी संदिग्धता निर्माण झाल्याचे दिसून येते. विरोधी पक्षनेतेपद असतानाही ज्या सलगीने व स्नेहाने अजितदादा सत्ताधाऱ्यांशी वागतात, हे पाहता ते पक्ष बदलणार, अशी कुणाचीही खात्री पटावी. त्यामुळे त्यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा असतानाच पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी भाकरी फिरविण्याचा सूर आळवावा अन् लगोलग पक्षाध्यक्षपदाचा राजीनामाही देऊन टाकावा, यामागे निश्चितच काहीतरी कार्यकारणभाव असणार. मागची जवळपास सहा दशके पवार राज्याच्या व देशाच्या राजकारणात आहेत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर राज्यातील सर्वांत प्रभावशाली नेत्यांमध्ये पवार यांची गणना होते. आपल्या राजकीय डावपेच व चालींच्या बळावर 1978 मध्ये पुलोदचा यशस्वी प्रयोग प्रत्यक्षात आणणाऱ्या पवार यांनी तब्बल चार वेळा राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविले आहे. काँग्रेसशी फारकत घेतल्यानंतर 1999 मध्ये राष्ट्रवादीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पवार यांनी 24 वर्षे या पक्षाचे एकहाती नेतृत्व केले आहे. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आणणे असो वा काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी अशा विरोधी विचारांच्या पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापण्याची कृती असो. पवारांच्या बुद्धीचातुर्य व रणनीतीचा हा आविष्कार ठरावा. पक्षासाठी पायाला भिंगरी लावून देशभर फिरणारा, अहोरात्र घड्याळाच्या काट्यांकडे लक्ष देणारा असा क्रियाशील नेता अकस्मात निवृत्तीची भाषा करतो, तेव्हा त्यामागचा नेमका मथितार्थ काय, असा प्रश्न कुणासही पडावा. केवळ भाकरी फिरविणे एवढ्यापुरताच सीमित त्याचा अर्थ आहे की आणखीही काही पदर त्यास आहेत, हे कळण्यासाठी थोडी वाटच पहावी लागेल. बाळासाहेबांनी शिवसेनाप्रमुखपदाचा दिलेला राजीनामा, त्याने शिवसेनेच्या पक्षवर्तुळात उडालेला गदारोळ आजही अनेकांच्या स्मरणात असेल. तथापि, शिवसैनिकांच्या रेट्यामुळे सेनाप्रमुखपदाचा राजीनामा त्यांना मागे घ्यावा लागला होता. अर्थात ठाकरे यांचेच हे ब्रम्हास्त्र वापरून पवार यांनी आपला खुंटा अधिक बळकट तर केला नाही ना, असे म्हणायला नक्कीच जागा आहे. ज्या ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या कार्यक्रमाच्या मंचावरून पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली, तेथे त्यांच्या राजीनाम्याला झालेला सार्वत्रिक विरोध पाहता पवार यांनी स्वत:चे महत्त्व वाढवून घेतले, यात कोणताही संदेह नाही. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांपासून ते प्रदेशाध्यक्षांपर्यंत सगळे ओक्सीबोक्सी रडतात नि एकूण या साऱ्याला भावनिक किनार प्राप्त होते, यातच सारे काही आले. दुसऱ्या बाजूला अजितदादा मात्र पवारांच्या निर्णयाचे समर्थन करत वेगळी भूमिका घेतात. हे सगळे अनाकलनीय असले, तरी आज ना उद्या आपल्याकडे पक्षाचे नेतृत्व यावे, यासाठीची पेरणी म्हणूनही त्याकडे पाहता येईल. परंतु, पक्षाच्या थिंक टँकपैकी एक असलेले पवार यांचेच ज्येष्ठ स्नेही सुप्रिया सुळे याही राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात, असे विधान करतात, तेव्हा त्याकडेही गांभीर्यानेच बघावे लागते. एकतर जनरेट्यातून पवार यांच्याकडेच पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी येऊ शकते किंवा सामूहिक नेतृत्वाचा निर्णय होऊ शकतो. यात राष्ट्रीय अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष अशी पदे निर्माण करीत सुप्रिया सुळे, जयंत पाटील व राष्ट्रवादीतील अन्य नेत्यांनाही संधी मिळू शकते. तथापि, अजितदादांकडे नेतृत्व देण्याची चूक पवार करतील, असे वाटत नाही. एखादी जबाबदारी सोपविली जाईल, इतकेच. खरे तर या माध्यमातून पवार यांनी अजितदादा बंड करणार नाहीत, अशी तजवीजही करून ठेवलेली दिसते. पहाटेच्या शपथविधीवरून अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू असतात. हे सर्व नाट्या पवारांनी घडवून आणल्याची वदंताही आहेच. पण, दस्तुरखुद्द शरद पवारांनीच आपल्या आत्मकथनात यावर प्रकाश टाकला आहे. ‘अजितदादांनी उचललेले ते पाऊल अत्यंत गैर होते. माझ्या नावाचा वापर करून आमदारांना राजभवनात नेण्यात आले. संबंधितांची दिशाभूल करीत हे घडविण्यात आले. अर्थात माहिती घेतल्यावर अजितबरोबर जेमतेम दहाच आमदार गेल्याचे कळाले,’ असा उल्लेख पवार या पुस्तकात करतात. यातील ‘जेमतेम’ या शब्दातून अजितदादांची ताकद अशी किती, हेच दाखविण्याचा पवार यांचा उद्देश असावा. तरीदेखील पवार यांच्या या खेळीचे वर्णन केवळ ‘अजितदादांच्या बंडावरचा उपाय’ असे करता येणार नाही. त्याचा तो एक भाग असला, तरी पक्ष एकसंध ठेऊन सत्ताधाऱ्यांच्या आक्रमणांना उत्तर देण्याची व्यूहरचना म्हणून त्याकडे प्रामुख्याने पहावे लागेल. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका 2024 मध्ये होणार आहेत. भाजपाने शिंदे गटाला हाताशी धरले असले, तरी त्याचा पक्षाला फार फायदा होईल, अशी स्थिती नाही. उद्धव ठाकरे यांची वाढती लोकप्रियता, महाविकास आघाडीची वज्रमूठ याचा भाजपाला फटका बसू शकतो, असे वेगवेगळ्या सर्व्हेचे अंदाज सांगतात. ही स्थिती बदलण्यासाठी अजितदादा व त्यांचे सहकारी गळाला लावण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असावा. तो फलद्रूप होण्याची शक्यता पवारनीतीमुळे तूर्तास तरी दिसत नाही. पवार यांनी आजी, माजी मुख्यमंत्र्यांना दिलेला धोबीपछाड उभ्या महाराष्ट्राने तीन वर्षांपूर्वी पाहिलेला आहे. ते काय विचार करतील नि कधी कोणते धक्कातंत्र वापरतील, हे सगळे अतर्क्यच. अर्थात पक्षाध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर पवार पक्षावरील पकड सोडतील, असे म्हणणे हा भाबडेपणाच. वास्तविक निवृत्तीची घोषणा हे पवारांचे शक्तिप्रदर्शनच आहे. आपणच पक्ष असल्याचे पवार यांनी याद्वारे दाखवून दिले आहे. पवार यांच्या या शक्ती आणि युक्तीनंतर कुणाची किती इच्छा असो. त्यांना एकमेकांच्या सांगाती जाण्याची संधी मिळेल काय, हेच आता पहावे लागेल.
Previous Articleसद्गुरूंची आठवण जरी केली तरी माझ्या पूजेचे पुण्य मिळते
Next Article जम्मू-काश्मीरमध्ये गवसलेल्या ’लिथियम’चा होणार लिलाव
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








