उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि मी आम्ही तिघांनी ठरवलं तर महाराष्ट्रात कदाचित काही होईल हे वेगळं सांगायची गरज नाही, असे रविवारी म्हणणारे शरद पवार एकीकडे महाविकास आघाडी भक्कम असल्याचे दाखवत असले तरी अजित पवारांच्या बंडानंतर आज होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रमाला पवार जाणार का? कारण पवारांचे नेतृत्व हे राज्यातील महाविकास आघाडीपुरते मर्यादित नसून देशपातळीवर नव्याने निर्माण झालेल्या इंडिया आघाडीसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे पुरस्कार जरी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळाला असला तरी चर्चा मात्र नेहमीप्रमाणे शरद पवारांच्या उपस्थितीची आहे.
राष्ट्रवादीत अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेबाबत नेहमीप्रमाणे जशी साशंकता निर्माण झाली आहे, तशीच साशंकता नरेंद्र मोदी यांचा आज पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने निर्माण झाली आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर सातारा कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर जाऊन पुन्हा नव्याने पक्ष उभारणीची घोषणा केली. त्यानंतर नाशिकमधील येवला येथील सभेला जात आक्रमकपणा दाखवला, मात्र त्यानंतर शरद पवारांच्या सभा झाल्या नाहीत. त्यामुळे शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह कायम आहे. राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनातही शरद पवारांसोबत असलेल्या आणि अजित पवारांसोबत न गेलेले राष्ट्रवादीचे आमदार हे फारसे आक्रमक झालेले दिसले नाहीत.
इतकेच नव्हे तर या आमदारांना अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांनी भरघोस निधी दिल्याचीही चर्चा आहे. एकीकडे महाराष्ट्रात राष्ट्रवादीतल्या दोन गटांमध्ये नेमकं काय चालू आहे याचा संभ्रम आहे. कायदेशीर लढाई काहीशी संथपणे सुऊ आहे. दोन्ही गटाचे प्रदेशाध्यक्ष अधिवेशनादरम्यान एकमेकांच्या जाहीर गळाभेटी घेत आहेत. लोकसभेतल्या अविश्वास प्रस्तावाआधी विरोधकांच्या एकजुटीची मोठी परीक्षा या विधेयकाच्या निमित्तानं होणार आहे. त्यात जर विधेयकावर मतदानाची वेळ अगदी मोदींच्या कार्यक्रमाच्याच दिवशी आली तर पवार कशाला प्राधान्य देतात यातून मोठे अर्थ निघणार यात शंका नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खाजगी संस्थेचा पुरस्कार स्विकारू नये असे वक्तव्य करत थेट मोदींवर हल्ला केला तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीदेखील शरद पवार यांनी जनतेच्या मनात संभ्रम निर्माण न करता आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे, तर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी शरद पवारांनी मोदींसोबत एकाच व्यासपीठावर जाण्याआधी एकदा विचार करा असे आवाहन केले आहे.
वास्तविक मोदींनी हा पुरस्कार स्विकारावा यासाठी स्वत: शरद पवारांनी मध्यस्थी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकीकडे बाळासाहेब थोरात मी आणि उध्दव ठाकरे महाराष्ट्रात एकत्र आलो तर काय होईल हे वेगळ सांगण्याची गरज नाही असे बोलणारे शरद पवार दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाबाबत हजेरी लावून महाविकास आघाडी आणि पर्यायाने देशपातळीवर भाजप विरोधात निर्माण झालेली इंडिया आघाडीतही संभ्रम निर्माण करणार का? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दुसरीकडे उध्दव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे. ठाकरे थेट मोदी आणि शहा यांना अंगावर घेत आहेत, माझ्या वडिलांनी जर मोदी-शहा यांना त्यावेळी वाचविले त्याचे हे आज पांग फेडतात का? असा सवाल ठाकरे यांनी करताना जर तुम्हाला मला संपवायचे असेल तर संपवाच, असा इशारा ठाकरे यांनी त्यांच्या मुलाखतीत देताना आपली भाजपविरोधी भूमिका कायम ठेवली आहे.
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर दीनानाथ मंगेशकर स्मफती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला होता. हा पुरस्कार स्विकारण्यासाठी 24 एप्रिल 2022 रोजी नरेंद्र मोदी मुंबईत आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे हजर राहणार असल्याची चर्चा होती मात्र त्यांनी मोदी यांच्या पुरस्कार कार्यक्रमाला जाण्याचे टाळून 80 वर्षीय चंद्रभागा शिंदे ज्यांनी राणा दाम्पत्यांविरोधात हनुमान चालिसा आंदोलनाच्या वेळी मातोश्रीबाहेर आक्रमक भूमिका घेतली होती. उध्दव ठाकरे यांनी मोदी यांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवताना थेट कुटुंबियांसह या आजीचे घर गाठले होते. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर आपला भाजप विरोध हा कायम ठेवला असल्याचे दिसत आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गेल्या 9 वर्षात मातोश्रीवर एकदाही आले नाहीत मात्र मोदी यांनी बारामती येथील गोविंद बागेत हजेरी लावताना शरद पवार हे आपले राजकीय गुरू असल्याचे वक्तव्य केले होत. नुकतेच राज ठाकरे यांनी “उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला.
पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी ऊजू होईलच”, अशी प्रतिक्रिया देताना भविष्यात सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्यातर आश्चर्य वाटता कामा नये असे बोलताना शरद पवारांचा या बंडामागे हात असल्याचा दावा केला होता. त्यामुळे शरद पवार जर मोदी यांच्या पुरस्कार सोहळ्dयाला हजर राहिले तर नक्कीच याचे दूरगामी राजकीय परिणाम राज्यातील भाजप विरोधी महाविकास आघाडी आणि देशातील इंडिया आघाडीच्या ऐक्यावर होणार हे निश्चित!
प्रवीण काळे