वृत्तसंस्था /विशाखापट्टणम
पवन कल्याण यांचा जनसेना पक्ष आणि चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाने आगामी निवडणूक एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. तेलगू सुपरस्टार पवन कल्याण यांनी तुरुंगात चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतल्यावर यासंबंधी घोषणा केली आहे. चंद्राबाबू नायडू यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी सीआयडीने 9 सप्टेंबर रोजी नंदयाल येथून अटक केली होती. 10 सप्टेंबर रोजी न्यायालयाने नायडू यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून यानंतर त्यांची रवानगी राजामहेंद्रवरम केंद्रीय तुरुंगात करण्यात आली आहे. पवन कल्याण यांनी राजामहेंद्रवरम केंद्रीय तुरुंगात जात नायडू यांची गुरुवारी भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्यासोबत नायडू यांचे पुत्र नारा लोकेश व तेदेपचे अन्य नेते होते. आंध्रप्रदेशात विधानसभा निवडणूक पुढील वर्षी लोकसभा निवडणुकीसोबत होणार आहे. जनसेना प्रमुख पवन कल्याण हे यापूर्वी तेदेपसोबतच्या आघाडीबद्दल साशंक होते, परंतु नायडू यांना अटक झाल्यावर त्यांनी स्वत:ची भूमिका स्पष्ट केली आहे. आंध्रप्रदेश आता वायएसआर काँग्रेसला आणखी सहन करू शकत नाही. केवळ निंदा करून गप्प बसणार नाही. चंद्राबाबू यांची तुरुंगातील भेट आंध्रप्रदेशसाठी महत्त्वपूर्ण क्षण असल्याचे पवन कल्याण यांनी म्हटले आहे.
रालोआसोबत पवन कल्याण
पवन कल्याण यांचा पक्ष रालोआत सामील आहे. 18 जुलै नवी दिल्लीत पार पडलेल्या रालोआच्या बैठकीत जनसेनेने भाग घेतला होता. तर चंद्राबाबू नायडू हे रालोआत सामील होतील की नाही, याविषयी सध्या स्थिती स्पष्ट नाही. जून महिन्यात चंद्राबाबू नायडू यांनी भाजप अध्यक्ष जगतप्रकाश न•ा तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यानंतर नायडू हे लवकरच रालोआत परतणार असल्याची चर्चा जोर पकडू लागली होती.









