कणसगिरी येथील 11.34 एकर जमीन कर्नाटक क्रिकेट असोसिएशनला वार्षिक भाडेतत्त्वावर
कारवार : कारवार तालुक्यातील सदाशिवगड ग्रा. पं. व्याप्तीतील कणसगिरी येथील महसूल खात्याच्या जमिनीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण कणसगिरी येथील 11.34 एकर जमीन कर्नाटक क्रिकेट असोसिएशनला वार्षिक भाडेतत्त्वावर हस्तांतर करार करण्यात आला. या करारावर कारवार जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी गंगुबाई मानकर आणि असोसिएशनतर्फे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू रघुराम भट यांनी सह्या केल्या. त्याचबरोबर कारवार तालुक्यासह जिल्ह्यातील क्रिकेटपटूंचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियमचे स्वप्न साकार होणार हे स्पष्ट झाले आहे. याप्रसंगी बोलताना रघुराम भट म्हणाले, काळी नदीच्या काठावर स्टेडियम निर्माण झाल्यानंतर स्थानिक क्रिकेटपटूंना राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. स्थानिकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. त्याशिवाय स्टेडियममुळे येथे देश-परदेशातील नागरिक दाखल होणार आहेत. त्यामुळे कारवार तालुक्यात पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून हस्तांतर करण्यात आलेल्या जमिनीची बाऊंड्री निश्चित करण्यात आल्यानंतर स्टेडियमच्या उभारणीला सुरुवात करण्यात येईल. पुढे येथे क्रिकेट प्रशिक्षण अॅकॅडमी सुरू करण्यात येईल. या अॅकॅडमीतर्फे 14, 16, 19 आणि 24 वर्षांखालील युवक आणि युवतींना क्रिकेटचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येईल. प्रत्येक गटात 30 क्रीडापटूंची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल, अशी माहिती पुढे रघुराम भट यांनी दिली.
जमीन लीज तत्त्वावर
याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी गंगुबाई मानकर म्हणाल्या, गोमाळाला राखीव ठेवण्यात आलेली जमीन महसूल नियमांच्या खाली लीज तत्त्वावर क्रिकेट असोसिएशनला देण्यात आली आहे.
स्टार हॉटेल्सची आवश्यकता
आमदार सतीश सैल याप्रसंगी म्हणाले, स्टेडियम निर्मितीची जागा निसर्गसौंदर्याने नटलेल्या ठिकाणी निवडण्यात आल्याने येथे देश-विदेशातील खेळाडू दाखल होणार आहेत. येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट मंचचे आयोजन करायचे झाल्यास, स्टार (पाच, सात) हॉटेल्स असणे गरजेचे आहे. त्यामुळे येथे चार-पाच हॉटेल्सची जबाबदारी आपली असेल.स्टेडियम उभारणीनंतर स्थानिक क्रीडापटूंना प्राधान्य देण्यात येईल. स्टेडियम उभारणीचे काम हाती घेण्याची वेळ आली आहे. यावेळी जि. पं. सीईओ ईश्वरकुमार कांदूसह अनेक मान्यवर उपस्थित होते.









