‘तरुण भारत’ वृत्ताची दखल : वाहनचालकांतून समाधान
बेळगाव : शहरात 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी एलअँडटीकडून पाईपलाईन घातली जात आहे. मात्र ठिकठिकाणी खोदाई करण्यात आल्याने रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. गोवावेस येथील मुख्य सर्कलमध्येच एलअँडटीकडून खोदकाम करण्यात आले होते. मात्र चर पुन्हा व्यवस्थितरित्या बुजविण्यात न आल्याने याबाबत ‘तरुण भारत’मधून वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. याची दखल घेत एलअँडटीकडून रविवारी गोवावेस येथील त्या चरीमध्ये पेव्हर्स बसविण्यात आल्याने वाहनचालकातून समाधान व्यक्त केले जात आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी एलअँडटी कंपनीकडे देण्यात आली आहे.
सध्या काही मोजक्याच प्रभागांमध्ये 24 तास पाणीपुरवठा केला जातो. महापालिकेच्या सर्व 58 प्रभागांमध्ये 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी एलअँडटीकडून जलवाहिनी घालण्याचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. मात्र हे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. लक्ष्मी टेक येथील जलशुद्धीकरण प्रकल्पासून मुख्य जलवाहिनी आणण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर बसवणकोळ येथील जल शुद्धीकरण केंद्रातून देखील मुख्य जलवाहिनीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचबरोबर गल्लोगल्लीत देखील जलवाहिनी घातली जात आहे. यासाठी रस्त्याच्या मधोमध तसेच दुतर्फादेखील खोदकाम केले जात आहे.
खोदलेल्या रस्त्यांच्या चरीमध्ये डांबर किंवा काँक्रिट घालण्याऐवजी केवळ माती टाकली जात आहे. त्यामुळे शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गोवावेस येथील मुख्य सर्कलमध्ये जलवाहिनी घालण्यासाठी एलअँडटीकडून खोदकाम करण्यात आल्यानंतर ती चर व्यवस्थितरित्या बुजविण्यात आली नव्हती त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. याबाबत ‘तरुण भारत’मधून बातमी प्रसिद्ध होताच एलअँडटीच्या अधिकाऱ्यांनी तेथील काम हाती घेतले आहे. खोदलेल्या चरीत भराव टाकून त्यावर रोलर फिरविला जात आहे. तसेच वरती पेव्हर्स घालून रस्ता जैसे थे करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.









