आयुक्तांनी लक्ष देण्याची नागरिकांतून मागणी
बेळगाव : बागलकोट रोडवरील मारुतीनगर ते सांबऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पेवर्स बसविण्यात येत आहेत. त्याला जोडण्यात येणारे खांब हे जुने आहेत. त्यामुळे काही दिवसांतच हा फुटपाथ खराब होणार आहे. दरम्यान, याठिकाणी गटारच नसल्याने सांडपाण्याचा प्रश्नही गंभीर बनणार असून महापालिकेने याकडे लक्ष द्यावे आणि संबंधित कंत्राटदाराला सूचना करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांतून होत आहे. एससी मोटर्ससमोर असलेल्या या रस्त्याच्या दोन्ही बाजुला सध्या पेवर्स बसविण्याचे काम सुरू झाले आहे. गटार देखील व्यवस्थित नसल्याने समस्या होणार आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्यप्रकारे गटारीचे नियोजन केलेले नाही. त्यामुळे पाणी देखील पुढे जाणे अवघड जाणार आहे. महत्वाचे म्हणजे या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे रस्त्यावरच पाणी साचण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. महापालिकेच्या अखत्यारिमध्ये हे काम सुरू आहे. याठिकाणी जुने खांब बसविण्यात येत असून याकडे आयुक्तांनी आता लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. मात्र, रस्त्याच्या दोन्ही बाजुला योग्यप्रकारे पाणी जाण्यासाठी गटारीचे नियोजन तितकेच महत्वाचे आहे. अन्यथा काही दिवसांतच हे फुटपाथ उखडणार आहे. तेव्हा याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.









