वृत्तसंस्था / पॅरिस
येथे झालेल्या पॅरिस डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत डॉमनिक प्रजासत्ताकची महिला धावपटू तसेच ऑलिम्पिक चॅम्पियन मेरीलिडे पॉलिनो आणि केनियाची चेरोटीच यांनी चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत महिलांच्या 400 मी. धावण्याच्या शर्यतीत पॉलिनोने 48.81 सेकंदांचा अवधी घेत नव्या स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक मिळविले. पॉलिनोने बहरीनच्या नासेरला मागे टाकले. नासीरने गेल्या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक मिळविले होते.
महिलांच्या 3000 मी. स्टिपलचेसमध्ये केनियाच्या चेरोटीचने 8 मिनिटे, 53.37 सेकंदांचा अवधी घेत सुवर्णपदक मिळविताना युगांडाच्या चेमुताईला मागे टाकले. या क्रीडा प्रकारात चेरोटीचची ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. डायमंड लीग स्पर्धेच्या डोहा आणि ओस्लो येथे झालेल्या टप्प्यातील स्पर्धांमध्ये चेरोटीचने सुवर्णपदक या क्रीडा प्रकारात पटकाविले होते. आता टोकियोमध्ये आगामी होणाऱ्या विश्व अॅथलेटिक्स स्पर्धेत या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळवून हे माझे स्वप्न असल्याचे चेरोटीचने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. याक्रीडा प्रकारात नायझेरीच्या विश्व विक्रमी तसेच 2022 च्या विश्व अॅथलेटिक स्पर्धेतील चॅम्पियन अमुसेनला या क्रीडा प्रकारात दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. अमेरिकेच्या 24 वर्षीय स्टार्कने महिलांच्या 100 मी. अडथळ्याच्या शर्यतीत 12.21 सेकंदांचा अवधी घेत सुवर्णपदक पटकाविले.
पुरुषांच्या 400 मी. अडथळा शर्यतीत ऑलिम्पिक चॅम्पियन राय बेंजामिनने 46.93 सेकंदांचा अवधी घेत नव्या स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक पटकाविले. युक्रेनची ऑलिम्पिक चॅम्पियन येरोस्लेव्ह मेहुचिकने महिलांच्या उंचउडी प्रकारात 2.10 मी.चे अंतर नोंदवित नवा विश्वविक्रम केला. पण तिला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या क्रीडा प्रकारात ऑस्ट्रेलियाच्या निकोला ओलीस्लेजर्सने सुवर्णपदक घेतले.









