टेसा थॉम्पसन देखील चित्रपटात
अभिनेता पॉल रेड, अभिनेत्री एमी एडम्स आणि टेसा थॉम्पसन हे तिघेही एका कॉमेडी ड्रामा चित्रपटात दिसून येणार आहेत. या तिघांनाही दिग्दर्शक जोनाथन डेट आणि वॅलेरी फारिस यांचा चित्रपट ‘द इनव्हाइट’मध्ये पाहता येणार आहे. हे तिन्ही दिग्गज कलाकार मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र दिसून येणार आहेत.
द इनव्हाइट हा चित्रपट स्पॅनिश भाषेतील चित्रपट ‘सेंटीमेंटल’ या चित्रपटावर आधारित असणार आहे. या चित्रपटावर यापूर्वी अनेक दिग्दर्शकांनी काम केले आहे. आता पुन्हा एकदा नव्या शैलीत ही कहाणी मोठ्या पडद्यावर साकारण्यात येणार आहे. या चित्रपटात एमी आणि पॉल रोमान्स करताना दिसून येणार आहेत.

चित्रपटाची कहाणी एका विवाहित दांपत्याच्या अवतीभोवती घुटमळणारी आहे. या दांपत्याच्या विवाहाला 15 वर्षे पूर्ण झाली असून त्यांना हे नाते आपण विनाकारण टिकवून आहोत असे वाटत असते. परंतु हा चित्रपट त्यांच्या वैवाहिक जीवनातील संकटांवर आधारित नसल्याचे सांगण्यात आले.
मूळ स्वरुपात हा चित्रपट या विवाहित दांपत्याच्या आसपासच्या वातावरणापासून अन्य गोष्टींवर आधारित आहे. चित्रपटात शेजाऱ्यांदरम्यान होणाऱ्या भांडणांपासून अनेक गोष्टी दर्शविण्यात आल्या असून त्या प्रेक्षकांना मनसोक्त हसायला लावणाऱ्या असतील. चित्रपटाची कथा रशीदा जोन्स आणि विल मॅककॉर्मेक यांची असणार आहे.









