६० वर्ष जुन्या साकवाचे तीन महिन्यात सुरु होणार नवीन बांधकाम
गुहागर वार्ताहर
तालुक्यातील पाटपन्हाळे मुख्य महामार्गापासून गणेशवाडीकडे जाणारा साकव सोमवारी मध्यरात्री अचानक कोसळला. सुमारे ६० वर्षापूर्वी कळ्या दगड, मातीपासून बांधलेला हा साकव कोसळल्याने मुख्य रस्त्यापासून गणेशवाडीकडून गावाकडे जाणाऱ्या ग्रामस्थांचा संपर्क तुटला आहे.
हा साकव जुना असल्याने तो गेली काही वर्षे धोकादायक बनला होता. या साकवाचे संरक्षक कठडे तुटून पडले होते.
पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन या साकवावरुन ये-जा सुरु होती. गुहागर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या बाबत वारंवार दुरुस्तीबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र याकडे आजपर्यंत दुर्लक्षच झाले होते. हा साकव ग्रामस्थ, शाळेची मुले व पालखी मार्गासाठी महत्वाचा होता. तो धोकादायक असल्याने दोन्ही बाजूंनी धोकादायक सूचनाफलक लावण्यात आले होते.
तरीही या साकवावरून ये-जा सुरु होती. हा साकव मध्यरात्री कोसळल्याने जीवितहानी टळली. साकव सोडल्याचे वृत्त कळताच ग्रामस्थ अनंत चव्हाण, दिनेश चव्हाण, प्रमोद चव्हाण, राकेश चव्हाण, सुमीत सावंत, मंगेश सावंत यांच्यासह पाटपन्हाळे ग्रामपंचायत कर्मचारी, गुहागर बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या साकव दुरुस्तीसाठी २ महिन्यांपूर्वी १० लाखाचा निधी मंजूर झाला आहे. त्याच्या कामाची निविदाही मंजूर होऊन ३ महिन्यात या साकवाचे काम सुरु होणार असल्याची माहिती अनंत चव्हाण यांनी दिली.









