नितीश कुमारांनी घेतली भेट : विरोधी आघाडीसाठी चर्चा झाली नसल्याचा दावा
► वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
2024 च्या लोकसभा निवडणुकीकरता विरोधी पक्षांची आघाडी उभारू पाहणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बीजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनायक यांची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमधील चर्चेतून विरोधी पक्षांच्या एकजुटतेकरता काय साध्य झाले हे अनुत्तरितच राहिले. दोन्ही नेत्यांनी सुमारे 2 तासांच्या चर्चेनंतर प्रसारमाध्यमांना सामोरे जाताना विरोधी पक्षांच्या एकतेविषयीच्या प्रश्नाला बगल दिली आहे.
या दोन्ही नेत्यांनी प्रसारमाध्यमांच्या अनेक प्रश्नांना उत्तर दिली. पटनायक यांच्यासोबतचा स्नेह अत्यंत जुना आहे. या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका. पटनायक यांच्यासोबत कुठल्याही प्रकारच्या आघाडीसंबंधी चर्चा झाली नसल्याचे नितीश कुमार यांनी म्हटले आहे. पटनायक यांनी नितीश यांच्याच भूमिकेचा पुनरुच्चार केला.
आमची मैत्री अत्यंत जुनी आहे. कुठल्याही आघाडीसंबंधी आम्हा दोघांमध्ये चर्चा झालेली नाही. बिहार भवनसाठी पुरी येथे जागा दिली जात असल्याचे पटनायक यांनी म्हटले आहे. पटनायक आणि नितीश कुमार यांच्या भेटीत विरोधी पक्षांच्या आघाडीबद्दल काहीच ठोस निष्पन्न झाले नसल्याचे बोलले जात आहे.
नवीन पटनायक यांनी एकप्रकारे नितीश कुमार यांच्या विरोधी पक्षांच्या आघाडीत सामील होण्यास नकार दिल्याचे मानले जात आहे. भाजप हा ओडिशातील प्रमुख विरोधी पक्ष आहे. तरीही नवीन पटनायक यांचे भाजप नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. विशेषकरून पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत पटनायक हे उत्तम संबंध राखून आहेत.
मागील वर्षी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपने मूळच्या ओडिशाच्या अन् आदिवासी समुदायाच्या नेत्या द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली होती. तेव्हा पटनायक यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले होते. केंद्र सरकारच्या अनेक विधेयकांना पटनायक यांच्या पक्षाने संसदेत अनेकदा समर्थन दिले आहे.









