वृत्तसंस्था/ पुणे
बालेवाडीच्या श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या नवव्या प्रो कबड्डी लिग स्पर्धेत शुक्रवारी पाटणा पायरेटस आणि युपी योद्धाज या संघांनी आपले विजय नोंदवले. पाटणा पायरेटसने जयपूर पिंक पँथर्सचा तर युपी योद्धाजने हरियाणा स्टीलर्सचा पराभव केला.
शुक्रवारच्या पहिल्या सामन्यात पाटणा पायरेटसने जयपूर पिंक पँथर्सचा 37-30 अशा सात गुणांच्या फरकाने पराभव केला. या विजयामुळे पाटणा पायरेटसने या स्पर्धेत आपली अपराजित घोडदौड कायम राखली आहे. त्यांनी आतापर्यंत आपल्या सहा सामन्यात एकही पराभव स्वीकारलेला नाही. शुक्रवारच्या सामन्यात पाटणा पायरेटसच्या सचिनने 8, रोहित गुलियाने 9 तर अष्टपैलू मोहमेदेझा चियानेहने 5 गुण नेंदवले. सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांनी आपल्या चढायावर गुण मिळवले. रोहित गुलिया आणि सचिन यांच्या सांघिक कामगिरीमुळे पाटणा पायरेट्सला गुण मिळू लागले तर जयपूर पिक पँथर्सतर्फे अर्जुन देसवालने आपल्या चढायांवर गुण मिळवले. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत पाटणा पायरेट्सने जयपूर पिंक पँथर्सवर 23-21 अशी दोन गुणांची आघाडी मिळवली होती. या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सचे दोनवेळा सर्व गडी बाद झाल्याने पाटणा पायरेट्सने आपली आघाडी 32-25 अशी वाढवली. अखेर पाटणा पायरेटसने हा सामना 7 गुणांच्या फरकाने जिंकला. पाटणा पायरेट्स संघातील मोहमेदेझा चियानेहला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

या स्पर्धेतील शुक्रवारी झालेल्या दुसऱया सामन्यात सुरिंदर आणि प्रदीप यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर युपी योद्धाज संघाने हरियाणा स्टीलर्सचा 40-34 अशा सहा गुणांच्या फरकाने पराभव केला. हरियाणा स्टीलर्सचा या स्पर्धेतील हा सलग तिसरा पराभव आहे. युपी योद्धाजच्या सुरिंदर गिलने 11 गुण तर प्रदीप नरवालने 8 गुण मिळवले. सामन्याच्या सुरुवातीला प्रदीपने आपल्या चढाईवर युपी योद्धाज संघाला गुण मिळवून दिला. त्यानंतर मनजितने दोन बोनस गुण तसेच मितूने आपल्या चढाईवर आणखी एक गुण मिळवल्याने हरियाणा स्टीलर्सने युपी योद्धाजवर आघाडी घेतली होती. त्यानंतर रोहित तोमरने आपल्या दोन चढायावर महत्त्वाचे गुण मिळवल्याने या दोन्ही संघातील गुणांचा फरक कमी झाला. सुरिंदर गिलने सुपर रेडवर हरियाणा स्टीलर्सचे सर्व गडी बाद केल्याने युपी योद्धासने आघाडी मिळवली. मध्यंतरापर्यंत युपी योद्धाजने हरियाणा स्टीलर्सवर 20-12 अशी आघाडी मिळवली होती. सामन्याच्या उत्तरार्धात सुरुवातीला के. प्रपंजनने आपल्या चढाईवर हरियाणा स्टीलर्सला गुण मिळवून दिला. त्यानंतर मोहित आणि जयदीप यांनी युपी योद्धाजचे सर्व गडी बाद करून सामन्याला रंगत आणली. सुरिंदरने आपल्या दुसऱया सुपर रेडवर युपी योद्धाजला सात गुणांची आघाडी मिळवून दिली आणि युपी योद्धाजने हा सामना अखेर जिंकला.









