पीकेएल : तेलुगू टायटन्सवर 38-36 गुणांनी रोमांचक विजय
वृत्तसंस्था/ कोलकाता
प्रो कबड्डी लीगच्या प्लऑफसाठी पात्र ठरणारा पाटणा पायरेट्स हा पाचवा संघ बनला आहे. येथे झालेल्या रोमांचक सामन्यात पाटणा पायरेट्सने पिछाडीवर पडल्यानंतरही तेलुगू टायटन्सचा 38-36 अशा गुणांनी पराभव केला.
पाटणा पायरेट्ससाठी मनजीतने चमकदार कामगिरी करताना 8 गुण मिळविले तर तेलुगू टायटन्सचा कर्णधार पवन सेहरावतने सुपर्ब 16 गुण नोंदवले. पण त्याची ही कामगिरी संघाचा पराभव टाळू शकली नाही. या सामन्याआधी पाटणा संघ सलग सात सामन्यात अपराजित राहिला होता. टायटन्सच्या पवनने लागोपाठ दोन रेड्समध्ये अधिक गुण मिळवित सुरुवात केली. पाटणाचा बचावही ठिसूळ झाल्याने टायटन्सने त्यांना चार मिनिटाच्या आतच ऑलआऊट करीत 10-3 अशी भक्कम आघाडी घेतली. 15 व्या मिनिटाला पवनने सुपर 10 मिळवित ही आघाडी 20-12 अशी केली.
पूर्वार्ध संपण्यास पाच मिनिटे असताना पाटणाने जोर वाढवला. संदीप दोन अप्रतिम रेड्स टाकल्या तर कृशन धूलने पवनला टॅकल केल्यानंतर टायटन्सचे केवळ दोन खेळाडू उरले. पाटणाचा कर्णधार सचिनने मिलाद जब्बारी व परवेश भैन्सवाल यांना बाद करीत टायटन्सला ऑलआऊट केले आणि टायटन्सची आघाडी 22-20 अशी केवळ दोन गुणांवर आणली. 23 व्या मिनिटाला पाटणाने पहिल्यांदा आघाडी घेतली आणि सचिनने लवकरच टायटन्सचा केवळ एक खेळाडू शिल्लक ठेवला. पण ओंकार पाटीलने बेंचवरून येत अप्रतिम सुपर रेड टाकत टायटन्सला ऑलआऊट होण्यापासून वाचवले.
सामना संपण्यास दहा मिनिटे असताना जब्बारीने सुपर टॅकल करीत पाटणा संघाला 28-27 असे आघाडीवर नेले. तीन वेळचे चॅम्पियन्स असलेल्या संघाने मनजीतला बेंचवरून आणले आणि त्याने अखेरच्या टप्प्यात सुपर टॅकल करीत त्याने आपला प्रभाव दाखविला. त्याने लागोपाठ अप्रतिम रेड्सही टाकल्या आणि 36 व्या मिनिटाला प्रतिस्पर्ध्याना ऑलआऊटही केले. यावेळी पाटणाने 36-31 अशी पाच गुणांची आघाडी घेतली होती. गुण कमी झाले तरी आघाडी कायम ठेवत सलग आठव्या सामन्यातही अपराजित राहण्याचा पराक्रम केला.









