वृत्तसंस्था / विशाखापट्टनम
2025 च्या प्रो कबड्डी लीग हंगामातील येथे खेळविण्यात आलेल्या अटीतटीच्या सामन्यात यूपी योद्धाजने पाटणा पायरेट्सचे आव्हान 34-31 अशा गुणांनी संपुष्टात आणले.
या सामन्यात यूपी योद्धाजतर्फे सुमित आणि आशु सिंग यांनी प्रत्येकी 5 गुण तर गगन गौडाने 7 गुण नोंदविले. सातव्या मिनिटाला पाटणा पायरेट्सचे पहिल्यांदा सर्वगडी बाद झाले. या सामन्यात पहिल्या 10 मिनिटांच्या कालावधीत पाटणा पायरेट्सने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर यूपी योद्धाज संघाला चांगलेच झुंजवले होते. या कालावधीत पाटणा पायरेट्सने 7-6 अशा केवळ एका गुणाची आघाडी मिळविली. पाटणा पायरेट्स संघातील युवा रायडर्स अयान लोचेब याचा खेळ दर्जेदार झाला. त्याने आपल्या चढायांवर 3 गुण मिळविताना दोनवेळा यूपी योद्धाजच्या खेळाडूंना दमविले. युपी योद्धाजतर्फे गगन गौडाने या कालावधीत दोन आक्रमक चढायांवर काही गुण आपल्या संघाला मिळवून दिले. त्यानंतर पाटणा पायरेट्सने पहिल्यां यूपी योद्धाजचे सर्वगडी बाद केले. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत पाटणा पायरेट्सने यूपी योद्धाजवर 19-13 अशी आघाडी घेतली होती. या कालावधीत पाटणा पायरेटसच्या अयान लोचेबने आपल्या चढायांवर 8 गुण मिळविले. सामन्याच्या उत्तराधार्थ पाटणा पायरेट्सने आपली पकड अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला.त्यांनी यूपी योद्धाजवर 23-19 अशी बढत 30 मिनिटांच्या खेळानंतर मिळविली होती. यूपी योद्धाजच्या भवानी रजपूत आणि गगन गौडा यांनी आपल्या चढायांवर झटपट गुण वसुल केले.
शेवटच्या 15 मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघांचा खेळ अधिक आक्रमक आणि अचूक झाल्याने पुन्हा दोघांची गुण संख्या समान राहिली. शेवटच्या 10 मिनिटांच्या कालावधीत यूपी योद्धाजने तीन गुणांची बढत घेत पाटणा पायरेट्सचे आव्हान संपुष्टात आणले.









