पंजाब पोलिसांच्या ‘स्पेशल 20’चे अनेक ठिकाणी छापे ः 9 आरोपींना आतापर्यंत अटक
वृत्तसंस्था / पतियाळा
पंजाबच्या पतियाळामध्ये खलिस्तानविरोधी रॅलीनंतर झालेल्या हिंसेप्रकरणी पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. पंजाब पोलीस विभागाची विशेष 20 पथके राज्यभरात छापे टाकत असून मागील 24 तासांमध्ये पोलिसांनी हिंसेचा सूत्रधार बरजिंदर परवाना समवेत आणखीन 6 आरोपींना जेरबंद केले आहे. यात 3 शीख कट्टरवादी, शिवसेना नेते हरीश सिंगला यांचा साथीदार शंकर भारद्वाज देखील सामील असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक मुखविंदर सिंह छीना यांनी दिली आहे.
सोशल मीडियावर द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी गग्गी पंडितविरोधात गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे. याप्रकरणी हरीश सिंगला आणि दोन कट्टरवादी शिखांसमवेत 3 जणांना पूर्वीच अटक करण्यात आली आहे. अटक झालेल्या आरोपींची संख्या आता 9 वर पोहोचली आहे.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपक पारिख यांच्या नेतृत्वाखाली पतियाळा पोलिसांची 20 विशेष पथके तयार करण्यात आली असून त्यांच्याकडून राज्यभरात छापे टाकले जात आहेत. परवानाला मोहाली येथून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस महानिरीक्षकांनी दिली आहे.
पतियाळा हिंसेवरून मुख्यमंत्री भगवंत मान यांनी नाराजी व्यक्त केल्यावर पंजाब पोलिसांनी व्यापक स्तरावर चौकशी सुरू करण्यात आली. आरोपींचे कॉल्स डिटेल्स तपासले जात आहेत. मोबाइल टॉवर लोकेशन पाहिले जातेय तसेच हिंसेचे व्हिहिओ आणि सीसीटीव्ही फुटेज पडताळून पाहिले जात आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, चिथावणीखोर वक्तव्ये, अनुमतीशिवाय धरणे आंदोलन कदापिही सहन केले जाऊ नये असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे पोलीस महानिरीक्षकांकडून सांगण्यात आले.
परवानावर हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे
बरजिंदर परवानाविषयी पोलिसांच्या तपासात अनेक मोठे खुलासे झाले आहेत. शिवसेनेच्या खलिस्तानविरोधी रॅलीदरम्यान परवानाने शीख निदर्शकांना चिथावणी देत काली माता मंदिरानजीक नेले होते. हिंसा सुरू झाल्यावर परवानाने तोंड लपवत दुचाकीवरून पळ काढला होता. पोलिसांनी त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती मिळविली आहे. यात त्याच्यावर हत्येच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे नोंद असल्याचे समोर आले आहे. तसेच तो दिल्ली सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनातही सामील होता.
कटाचीही चौकशी होणार
पतियाळा हिंसेमागे पूर्वनियोजित कट असून यात कोण सामील आहेत याची चौकशी केली जाणार आहे. तपास प्रभावित होऊ नये म्हणून सध्या याविषयी अधिक काही सांगता येणार नाही. पूर्ण तपासानंतर पोलीस सर्व माहिती समोर ठेवणार असल्याचे पोलीस महानिरीक्षकांनी सांगितले.









