प्रभू रामचंद्रांची पत्नी सीता ही जन्मत: राजकन्या होती. श्रीरामाशी विवाह झाल्यानंतर अयोध्येमध्ये राजमहालातच आली. परंतु पुढे जेव्हा श्रीराम वनवासात जाण्यास निघाले तेव्हा सीतेचा निरोप घेण्यासाठी तिच्या महालात गेले. सीतेला रामाच्या वनवासाबद्दल काहीही माहीत नव्हते. ती कित्येक तासांपासून आनंदात त्यांच्या आगमनाची वाट पहात होती. जेव्हा श्रीराम सीतेच्या गृहात प्रवेशले, तेव्हा सीतेच्या लगेचच लक्षात आले की, ते घामाघूम झालेले होते आणि निस्तेज व चिंतेत दिसत होते. रामाबरोबर त्यांचा नेहमीचा राजसी सेवकांचा तांडा नव्हता. सीतेने गंभीर होत विचारले, “प्रिय रामा, काय बरे घडले आहे?” राम उत्तरले “माझ्या पिताश्रींनी मला राज्य सोडून जाण्याची व वनात राहण्याची आज्ञा केली आहे. सिंहासनाचा उत्तराधिकारी म्हणून भरताचा राज्याभिषेक होणार आहे. प्रिय सीते, माझ्या पित्याची आज्ञा मान्य करण्यावाचून मला अन्य कोणताही पर्याय नाही. तथापि, तू इथेच राहावेस असे मला वाटते. प्रतिदिन माझ्या पित्याकडे जाऊन त्यांना नमस्कार कर आणि भरताच्या आज्ञांचे विना तक्रार पालन कर.”
श्रीरामांचे शब्द कानी पडताच सीता क्षुब्ध झाली, प्रेमापोटी रागाच्या भरात ती उत्तरली “हे रामा, माझ्या पतिदेवा, पुऊषोत्तमा आपण मला काय उपदेश करत आहात? पतीच्या भाग्याची वाटेकरी होणे हे पत्नीचे कर्तव्य आहे. मला तुमच्याबरोबर वनात गेलेच पाहिजे. पिता, माता, बंधू, पुत्र आणि स्नुषा या सर्वांचे आपापले स्वतंत्र अस्तित्व असते. परंतु पत्नीला मात्र पतीचा मार्ग अनुसरण्यावाचून दुसरा पर्याय नसतो. ती इतर कोणाचाही अगदी स्वत:चाही आश्र्रय घेऊ शकत नाही. माझा आसरा फक्त माझे पती आहेत. म्हणूनच तुमच्या पाठोपाठ येण्याचा मी निश्चय केला आहे. मी तुमच्या मागे मागे चालेन आणि तुम्ही अन्नग्रहण केल्यावरच मी अन्नग्रहण करेन. तुम्ही अप्रसन्न व्हाल असे कोणतेही कार्य करणार नाही.” त्यावर श्रीराम म्हणाले, “सीते! वनवासातील कठीण, तपस्वी आणि खडतर जीवन जगण्याची तुला सवय नाही, तू राजमहालात वाढलेली राजकन्या आहेस. पण या नकाराला न जुमानता सीता श्रीरामांना म्हणाली, “जोपर्यंत मी तुमच्यासमवेत राहीन, तोपर्यंत कोणतीही गैरसोय किंवा धोका माझ्यासाठी महत्त्वाचा नसेल. हे राम! पतीशिवाय पत्नी जिवंत राहू शकत नाही. जर तुम्ही मला तुमच्याबरोबर येण्यास परवानगी दिली नाहीत तर, मी विष प्राशन करून, अग्निप्रवेश करून किंवा पाण्यात उडी घेऊन माझ्या जीवनाचा अंत करेन.” त्यानंतर सीतेची तीव्र इच्छा आणि मानसिक तयारी पाहून श्रीरामांनी तिला बरोबर येण्यास संमती दिली. अशा प्रकारे सीतेने स्वेच्छेने आपल्या पतीचा मार्ग अनुसरला आणि एक पतिव्रता स्त्री कशी असावी आणि तिने आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर पतीची साथ कशी द्यावी याचे उदाहरण समाजासमोर ठेवले.
पुढे वनवासात असताना एकदा अत्री ऋषीच्या आश्र्रमात आले असता अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी अनसूयेने सीता-राम यांचे प्रेमाने स्वागत केले. येथे सीतेचे सदाचारी वर्तन पाहून अनसूयेने तिला पतिव्रता धर्माचा उपदेश केला. अनसूया सीतेला म्हणाली, “सुदैवाने तू आपली दृष्टी सदाचारावर केंद्रित केलेली आहेस. सीते, ज्यांना वनवासात पाठवले गेले आहे ते तुझे पती श्रीराम, यांना तू अनुसरते आहेस हे पाहून मला खूप आनंद झाला. आपला पती नगरात असो वा वनात, अनुकूल परिस्थितीत असो वा प्रतिकूल, याची पर्वा न करता पतीला सर्वथा प्रिय मानणाऱ्या स्त्रियांची वैभवसंपन्न विश्वे स्वत: वाट पहात असतात. धर्मपरायण स्त्रियांच्या दृष्टीने पती हा परमेश्वर असतो, हे राजकुमारी माझ्या मते पतीशिवाय स्त्रीला दुसरा मोठा मित्र असूच शकत नाही आणि तोच तिला तपस्येमुळे प्राप्त होणाऱ्या अक्षय फळासारख्या तिने इच्छिलेल्या सर्व वस्तू पुरविण्यास समर्थ असतो. तथापि, अशा दुष्ट स्त्रिया, ज्यांच्या हृदयात आसक्ती भरलेली आहे, ज्या सदाचार आणि दुराचाराचे भान न ठेवता आपल्या पतीवर स्वामित्व गाजवतात आणि आपल्या इच्छेनुसार संचार करतात, त्या रितीनुसार पतीला अनुसरत नाहीत. खरोखर, हे मिथिलेच्या राजकुमारी, लालसांना बळी पडलेल्या अशा स्त्रिया सद्गुणापासून दुरावतात आणि त्यांना केवळ अपकिर्तीच प्राप्त होते. उलटपक्षी तुझ्यासारख्या स्त्रिया ज्या पातिव्रत्यासारख्या गुणांनी सुशोभित आहेत आणि ज्यांना जगात चांगले काय वाईट काय यांची पारख आहे त्यांना पुण्यात्माप्रमाणेच स्वर्गप्राप्ती होते. म्हणून या राजपुत्राच्या सेवेत समर्पित होऊन, त्यांना आपले आराध्य दैवत मानून, काळजीपूर्वक त्यांची सेवा करत रहा आणि त्यांच्या सोबतीने धर्माचे पालन कर. त्यामुळे तुला सहजपणे कीर्ती व त्याचबरोबर पुण्यही प्राप्त होईल.”
अशा पतिव्रता सीतेला वनवासात श्रीरामाबरोबर आणि नंतर श्रीरामांच्या विरहात अशोकवनात जवळ जवळ 10 महिने रहावे लागले, पण पती श्रीराम यांना ती एक क्षणभरही विसरली नाही. सीतेच्या विरहभावनेचे वर्णन संत तुकाराम महाराजांनी एका भावपूर्ण अभंगात केले आहे.
वासुगीच्या वनी सीता शोक करी । कांहो अंतरले रघुनाथ दुरी । येऊनी गुंफेमाजी दुष्टे केली चोरी । कांहो मज आणिले अवघड लंकापुरी ।।1।। सांग वो त्रिजटे सखिये ऐसी मात । देईल कां नेदी भेटी रघुनाथ । मन उताविळ जाला दुरी पंथ । राहो न सके प्राण माझा कुडी आंत ।।2।। काय दुष्ट आचरण होते म्यां केले । तीर्थ व्रत होते कवणाचे भंगिले । गाईवत्सा पत्नीपुऊषा विघडिले । न कळों वो संचित चरण अंतरिले ।।3।। नाडियेले आशा मृगकांतिसोने। धाडिले रघुनाथ पाठिलागे तेणे । उल्लंघिली आज्ञा माव काय मीं जाणे । देखोनी सुनाट घेऊनि आले सुनें ।।4।। नाही मूळ मारग लागे आणिक सोय । एकाविण नामे रघुनाथाच्या माय । उपटी पक्षिया एक देऊनी पाय । उदकवेढ्यामध्ये तेथें चाले काय।।5।। जनकाची नंदिनी दु:खे ग्लानी थोरी । चुकली कुरंगिणी मेळा तैशा परी। संबोखी त्रिजटा स्थिर स्थिर वो करी । येईल तुकयास्वामी
राम लंकापुरी ।।6।। अर्थात ‘सीता ही लंकेमध्ये अशोकवनात शोक करीत आहे, ती त्रिजटेजवळ म्हणते-‘सखे त्रिजटे, माझे स्वामी रघुनाथ हे मला का अंतरले? दुष्ट रावणाने पर्णकुटीत येऊन मला पळविले आणि असल्या या अवघड लंकापुरीत मला का हो आणले? हे त्रिजटे सखे, मला नक्की सांग की माझे रघुनाथ मला भेटतील की नाही? माझे मन फार उतावळे झाले आहे, पण ते तर येथून फार दूर आहेत आणि माझ्या या कुडीत प्राण राहिनासा झाला आहे. मी पूर्वजन्मी काही क्रूर कर्म केले होते काय? कोणाचे व्रत भंग केले काय? गायीची आणि वासराची ताटातूट केली काय? पत्नीची आणि पतीची ताटातूट केली काय? माझे संचित कसे आहे ते कळत नाही. पण रघुनाथांच्या चरणापासून मी अंतरले आहे एवढे खरे. त्या सुवर्णमृगाच्या आशेनेच मला फसविले आणि मीच रघुनाथांना त्याच्या मागे धाडले आणि लक्ष्मणाची आज्ञा मी मोडली. झोपडी रिकामी पाहून त्या रावणरूपी कुत्र्याने मला येथे बळजबरीने आणले. आता या संकटातून सुटण्यासाठी रघुनाथाच्या नामाशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही. त्या दुष्ट रावणाने त्या जटायू पक्षाच्या अंगावर पाय देऊन त्याचे पंख उपटले आणि त्यास मारले. सभोवती पाण्याने वेढलेल्या स्थितीत बिचाऱ्या जटायूचे काहीच चालले नाही.
अशा प्रकारे जनकराजाची कन्या दु:खाने व्याकुळ झाली. हरिणीच्या कळपातून हरिणी वेगळी झाल्यासारखी तिची अवस्था झाली. समोरची त्रिजटा तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागली. तुकाराम महाराज म्हणतात की राम लवकरच लंकेस येऊन तिची सुटका करतील असे तिने सांगितले.
सीतेच्या विरहावस्थेचे वर्णन करता करता स्वत: तुकाराम महाराजही भगवान श्रीरामाचा विरह अनुभवीत आहेत आणि सांगत आहेत अशा अवस्थेत केवळ हरिनामच एक आश्र्रय आहे. भौतिक जगातील जीवांची अवस्थाही सीतेसारखीच आहे, आपले नाथ भगवान श्रीराम यांच्यापासून मायावी रावणाने जीवाला हरण करून या जगात बंधनात ठेवले आहे. अशा परिस्थितीत हनुमंतासारखा हरिभक्त हरिनामाच्या साहाय्याने सीतेसारख्या जीवांना मुक्त करू शकतात.
-वृंदावनदास








