25 रोजी जाहीर पक्षप्रवेश
भोगावती: सडोली खालसा (ता. करवीर) येथे सुमारे 25 हजारांहून अधिक कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक मंत्री व आमदार उपस्थित राहणार आहेत.
करवीर विधानसभा मतदारसंघासह उर्वरित करवीर तालुका, गगनबावडा व पन्हाळा तालुक्यातील कार्यकर्त्यांसह राधानगरी तालुक्यातील तीन जिल्हा परिषद मतदारसंघातील पी. एन. प्रेमी कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार आहेत. क्रिडांगणावर भव्य मंडपात 25 हजार कार्यकर्त्यांची बसण्याची सोय केली आहे.
मात्र सुमारे 40 हजार कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहतील, अशी माहिती भोगावती कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील यांच्यासह भोगावती कारखाना व शिक्षण प्रसारक मंडळाच्या आजी-माजी संचालक होते.
तसेच अनेक गावचे सरपंच, सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. भोगावती कारखाना सभासदांच्या मालकीचा रहावा यासाठी पी. एन. पाटील यांनी 30 ते 40 वर्षे प्रयत्न केले. अजितदादांच्या पहिल्या भेटीत भोगावती कारखान्याला मदत करण्यासाठी काहीही अडचण येणार नसल्याचे सांगितले होते. यानुसार मदतीची कार्यवाही यापूर्वीच चालू झाली. त्यावेळी राष्ट्रवादी पक्षप्रवेशाचा काहीच विषय नव्हता.
मात्र बऱ्याच दिवसांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नामुळेच पक्षप्रवेशाचा हा विषय पुढे आला, असे प्रा. पाटील यांनी स्पष्ट केले. मात्र करवीर व राधानगरी तालुक्यात भोगावती कारखान्याचा वारंवार उल्लेख करून कारखाना व संचालक मंडळाला टार्गेट केले जाते. हे चुकीचे आहे. कारण दोन्ही बंधूंच्या पक्षप्रवेशातील कारखाना हा एक घटक आहे. पी. एन. पाटील गट टिकावा, स्वतंत्र अस्तित्व रहावे, पाठिंबा देणाऱ्या 1 लाख 32 हजार लोकांना योग्य न्याय देता यावा, आदी विविध कारणांचा यामागे समावेश आहे. असे प्रा. पाटील यांनी सांगितले.
पक्षप्रवेश कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे अनेक मंत्री, आमदार व राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर व सर्व जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेला गोकुळचे माजी संचालक पी. डी. धुंदरे, संचालक धिरज डोंगळे, प्रा. चौगले, कृष्णराव पाटील, शिवाजी कारंडे, प्रा.सुनील खराडे, उमरसो पटेल-पाटील, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक सुभाष पाटील व बाजीराव चौगले आदी मान्यवर उपस्थित होते








