अपडेटसाठी मर्यादित वेळ दिल्याने ऊग्णांची हेळसांड
बेळगाव : कर्करोग, हृदयरोग व इतर आजाराने ग्रस्त असणाऱ्या नागरिकांना रेशनकार्ड अपडेटसाठी सर्व्हर डाऊन असल्याने फटका बसत आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याने अपडेटसाठी मर्यादित वेळ दिल्याने ऊग्णांची हेळसांड सुरू आहे. ग्राहक सेवा केंद्र तसेच सायबर सेंटरवर ऊग्ण व त्यांचे कुटुंबीय यांची गर्दी होत असल्याने अपडेटसाठी वेळ वाढवून रेशन दुकानदारांनाच अपडेटसाठी यंत्रणा देण्याची मागणी करण्यात येत आहे. रेशनकार्डमध्ये अनेक त्रुटी आहेत. मयतांची नावे काढून नवीन नावे जोडण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू आहे. विशेषत: ज्या ऊग्णांना कर्करोग, हृदय रोगासारखे आजार झाले आहेत, त्यांना ऑपरेशनसाठी रेशनकार्डची आवश्यकता असते. परंतु त्यामध्ये त्रुटी असल्याने ऊग्णांचे ऑपरेशन काही दिवस पुढे ढकलावे लागत आहे. यामुळे रेशनकार्ड अपडेट करून घेण्यासाठी नागरिक सेवा केंद्र व सायबर सेंटरमध्ये गर्दी करीत आहेत. अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून सकाळी 10.30 ते सायंकाळी 5 यावेळेत सर्व्हर सुरू केला जातो. परंतु संपूर्ण राज्यभरातून लॉगइन केले जात असल्याने सर्व्हर डाऊनची समस्या जाणवत आहे. यामुळे ऊग्ण व वयोवृद्धांना दिवसभर ताटकळत बसावे लागते. अपडेट झाल्यानंतर अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून मंजुरी घ्यावी लागते. परंतु मर्यादित अधिकारी व कर्मचारी असल्याने नागरिकांचा वेळ व पैसा वाया जात आहे.









