पाहणी करून रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी
धामणे : जुने बेळगाव ते धामणे हा चार कि. मी. चा रस्ता अत्यंत खराब झाल्यामुळे वाहन धारकांना या रस्त्याने प्रवास करणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागत आहे. जुने बेळगावच्या कलमेश्वर तलावापासून या रस्त्याची सुरुवात होवून धामणे येथील कलमेश्वर मंदिर शेजारी हा रस्ता पोहोचतो. या रस्त्याने शहराकडे येण्यासाठी एक कि. मी. अंतर कमी होते. त्यामुळे या रस्त्याने वाहनांची रहदारी जास्त वाढली आहे. परंतु या रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण होवून संपूर्ण डांबरीकरण खराब होवून रस्त्यावरील खडी उखडून खड्डे निर्माण झाल्यामुळे या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहन धारकांची बरीच गैरसोय होत आहे.
गेल्या 10 वर्षात या रस्त्याची कसल्याही प्रकारची दुरुस्ती नाही. त्यामुळे खराब झाला आहे. या रस्त्याच्या शेजारी दुतर्फा जुने बेळगावची शेती आहे. धामणे गावापासून येथील शेतकऱ्यांची शेती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा रस्ता फार उपयोगी आहे. तसेच शहराच्या पूर्व भागात जाणाऱ्या धामणे, कुरबरहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी येथील वाहन धारकांना या रस्त्याचा चांगला उपयोग असल्याने वाहन धारकांनी गर्दी वाढली आहे. परंतु रस्ता जास्तच खराब झाल्याने गैरसोय होत आहे. संबंधित वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधीनी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी प्रयत्न करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.









