प्रतिनिधी /बेळगाव
एरव्ही उड्डाणपुलावरील पथदीप सुरू करण्यासाठी सातत्याने तक्रारी केल्या जातात. तरीदेखील याची दखल घेतली जात नाही. मात्र आता मंत्री महोदय आणि विविध खात्यांचे अधिकारी बेळगावात आले असल्याने सर्व पथदीप सुरू करण्यात आले आहेत. नेहमी अंधाराच्या विळख्यात सापडलेल्या कपिलेश्वर उड्डाणपुलावरील पथदीप बुधवारी दिवसादेखील सुरू ठेवण्यात आले होते.
महापालिकेच्या पथदीप देखभाल विभागाचा गैरप्रकार चव्हाट्यावर आला असून काही ठिकाणी पथदीप रात्रंदिवस सुरू आहेत. शहरात विविध ठिकाणी उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी बसविण्यात आलेले पथदीप कधी सुरू तर कधी बंद रहात असतात. कपिलेश्वर उड्डाणपुलावरील आणि गोगटे चौक येथील बसवेश्वर उड्डाणपुलावर नेहमी अंधार पसरलेला असतो. पथदीपांची देखभाल वेळेवर आणि व्यवस्थित केली जात नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. येथील पथदीप नेहमी बंद रहात असून याबाबत महानगरपालिकेकडे अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या. पण याची दखल घेण्याकडे कानाडोळा केला जातो. मात्र अलीकडे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व पथदीपांची दुरुस्ती करून सर्व ठिकाणांचे पथदीप सुरू ठेवण्याचा आटापिटा केला जात आहे. कपिलेश्वर उड्डाणपुलावरील पथदीपांची दुरूस्ती करण्यात आली आहे. सध्या मंत्री महोदयांसह वरिष्ठ अधिकारी बेळगावात दाखल झाले आहेत. त्यामुळे सर्व परिसरातील पथदीप सुरू ठेवून स्मार्ट सिटी झाल्याचा दिखावा केला जात आहे. त्यामुळे नेहमी अंधाराच्या विळख्यात असलेल्या कपिलेश्वर उड्डाणपुलावरील पथदीप दिवसाही सुरू रहात आहेत. बुधवारी पुलावरील सर्व पथदीप सुरु होते. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात आले.









