कुद्रेमनी : बेळगाव-चंदगड महामार्गावरील कुद्रेमनी फाट्यापासून चंदगड तालुक्यातील शिनोळी औद्यागिक वसाहतीपर्यंतच्या रस्त्यावरील खड्ड्यांचे डांबरीकरण पॅचवर्क सुरू झाले आहे. पावसामुळे या रस्त्यावर झालेल्या खड्ड्यांमुळे अक्षरश: रस्त्याची चाळण होऊन रहदारीसाठी रस्ता जीवघेणा ठरला होता. रस्त्यावरील खड्ड्यांचे डांबरीकरण होत असल्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता दुरुस्त झाल्याने वाहतूकदारांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. निम्म्या रस्त्याचे डांबरीकरणचे पॅचवर्क पूर्ण झाले असून कांही दिवसांत शिनोळी औद्योगिक वसाहतीपर्यंतचे पॅचवर्कचे काम पूर्ण होणार असल्याचे सांगितले जाते.
सध्या चंदगड सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने हे काम केले जात आहे. या रस्त्याची कांही अंतर हद्द बेळगाव तालुक्यात व काही हद्द चंदगड क्षेत्रात आहे. बेळगावपासून महाराष्ट्रापर्यंत चंदगड, आंबोली, सावंतवाडी, वेंगुर्ला, गोवा आदी ठिकाणापर्यंत ये-जा करण्यासाठी असंख्य वाहनांची वर्दळ प्रचंड प्रमाणात रस्त्यावर नेहमी होत असते. पूर्वीच्या बैलगाड्या ये-जा करण्याकरताच हा रस्ता अत्यंत अरुंद आहे. सध्याच्या वर्तमान काळात या रस्त्यावरुन प्रचंड वाहतुकीच्या स्थितीचा विचार करून हा रस्ता रुंदीकरण होणे आवश्यक आहे. अरूंद रस्त्यामुळे अनेकवेळा अपघात घडून जीवघेणी स्थिती निर्माण झाल्याचे मत व्यक्त होत आहे. बेळगावपासून सावंतवाडी-गोव्यापर्यंत जाणाऱ्या या रस्त्याचे दुपदरीकरण करून जीवघेणी परिस्थिती टाळावी, अशी मागणी सध्या होत आहे.









