खराब रस्त्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ, पुन्हा रास्तारोकोचा इशारा
वार्ताहर /जांबोटी
बेळगाव-चोर्ला राज्य महामार्गाच्या दुरुस्तीकडे शासनाचे दुर्लक्ष झाले असून खराब रस्त्यामुळे वाहनधारकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज निर्माण झाले असून अपघातांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. तरी या रस्त्याची त्वरित दुरुस्ती व पॅचवर्क करावे, अशी मागणी जांबोटी-कणकुंबी भागातील नागरिकांमधून होत आहे. या रस्त्याचा समावेश बेळगाव-पणजी व्हाया चोर्ला राज्य महामार्ग अंतर्गत होतो. या रस्त्याने बेळगाव-गोवा हे अंतर 40 किलोमीटरने कमी होत असल्यामुळे प्रवासी व मालवाहतूकदार इंधन व वेळेची बचत करण्यासाठी या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. या रस्त्यापैकी जांबोटी ते पिरनवाडीपर्यंतचा रस्ता काही प्रमाणात सुस्थितीत आहे. मात्र जांबोटीपासून ते चोर्ला, गोवा हद्दीपर्यंतच्या रस्त्याची पार दुर्दशा झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे साफ दुर्लक्ष झाल्यामुळे वाहनधारकांना अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. चार महिन्यापूर्वी बेळगाव-चोर्ला रस्त्याच्या दुरुस्तीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जांबोटी-कणकुंबी भागातील नागरिकांच्यावतीने कणकुंबी येथे रास्तारोको करून प्रशासनाला जाब विचारला होता. त्यावेळी संबंधित अधिकारी वर्गाने रास्ता रोकोची दखल घेऊन जांबोटीपासून ते चोर्ला, गोवा हद्दीपर्यंतच्या रस्त्याच्या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करून कामाची निविदा लक्ष्मी व्यंकटेश कंत्राटदाराला मंजूर केली होती. त्यानुसार जांबोटी ते चोर्लापर्यंतच्या रस्त्यावरील खड्ड्यांवर खडी-माती घालून तात्पुरती डागडुजी करून रस्ता वाहतुकीला योग्य बनविला होता. मात्र दुरुस्त केलेल्या रस्त्यावरील खड्डे पुन्हा उखडण्यास प्रारंभ झाल्यामुळे खराब रस्त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
रस्ता दुरुस्तीसाठी 60 कोटीचा निधी?
बेळगाव-पणजी व्हाया चोर्ला आंतरराज्य महामार्गाचे महत्त्व लक्षात घेऊन दोन वर्षांपूर्वी या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. मात्र हा रस्ता पर्यावरणदृष्ट्या अति संवेदनशील क्षेत्रातून जात असल्यामुळे या रस्त्याच्या विकासासंदर्भात पर्यावरणप्रेमींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे रस्त्याच्या विकासाचा प्रस्ताव अद्याप लालफितीतच अडकला आहे. तसेच वनखात्याने रस्त्याच्या कामावर निर्बंध लादल्यामुळे या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करणे कायद्याच्या कचाट्यात अडकल्यामुळे या रस्त्याच्या राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा रद्द करून रस्त्याची रुंदी जैसे थे ठेवून राज्य सरकारने पिरनवाडी ते चोर्ला, गोवा हद्दीपर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 60 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे या रस्त्याच्या कामाला त्वरित सुरुवात होणे आवश्यक आहे. तरी आमदार विठ्ठल हलगेकर व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बेळगाव विभागाच्या वरिष्ठ अभियंत्यनी लक्ष घालून बेळगाव-चोर्ला रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला तातडीने प्रारंभ करावा, अशी मागणी नागरिकांसह वाहनधारकांतून होत आहे.
रस्ता त्वरित दुरुस्त करा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार
या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत देखील मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून दुचाकीसारखी वाहने चालविणे देखील दुरापास्त बनले आहे. वाहनधारकांची खराब रस्त्यामुळे होणारी गैरसोय दूर करण्यासाठी जांबोटी ते गोवा हद्दीपर्यंतच्या संपूर्ण रस्त्यावरील खड्डे पुन्हा बुजूवून त्याचे पक्के पॅचवर्क करून रस्ता वाहतुकीस योग्य बनवावा, अशी मागणी नागरिकांमधून अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. मात्र लक्ष्मी व्यंकटेश कन्स्ट्रक्शनचे कंत्राटदार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्याच्या दुरुस्ती कामाला त्वरित प्रारंभ करावा. अन्यथा पुन्हा रास्तारोको करण्याचा इशारा जांबोटी-कणकुंबी भागातील नागरिकांनी दिला असून यासंदर्भात बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात येणार असल्याची माहिती या भागातील सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.









