पुणे / वार्ताहर :
ओडिशा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसटीएफ) अटक केलेल्या पुण्यातील संगणक अभियंत्याची चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. मूळच्या सातारा जिल्हय़ातील पाटण तालुक्यातील या अभियंत्याने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय तांत्रिक माहिती व सांकेतिक शब्द (ओटीपी) पुरविल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दरम्यान, विशेष तपास पथकाने त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर करीत न्यायालयाकडून प्रवासी कोठडी (ट्रान्झिट रिमांड) मिळविली आहे.
अभिजीत संजय जांबुरे असे त्याचे नाव आहे. पुण्यातील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत तो काम करत होता. गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल विद्यापीठातील तो पदवीधर आहे. त्याने सांख्यिकी विषयातील पदवी मिळवली आहे. तो पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील दोन अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता. स्वत: तयार केलेल्या ओटीपींची विक्री त्याने सायबर गुन्हेगारांना केल्याचा संशय आहे. पाकिस्तानातील गुप्तचर अधिकाऱ्यांना त्याने समाजमाध्यमातील संदेश सुविधेद्वारे (मेसेंजर) ओटीपी दिले होते. तो समाजमाध्यमातील संपर्क सुविधेद्वारे काही पाकिस्तानी आणि नायजेरियन नागरिकांच्या संपर्कात असल्याचे ओदिशा एसटीएफने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
ओडिशा पोलिसांच्या पथकाने यापूर्वी या प्रकरणात चौघांना अटक केली आहे. आरोपी ऍक्टिव्हेट न झालेले सिमकार्ड दुसऱ्या व्यक्तीच्या कागदपत्रांचा वापर करून खरेदी करायचे. ओटीपी तयार करून डिजिटल वॉलेटला एक ते 30 हजार रुपयांना विक्री करायचे. आरोपींनी अशा पद्धतीने हजारो ओटीपी सायबर गुन्हेगारांना पुरविल्याचा संशय आहे. दरम्यान, पोलिसांच्या विशेष तपास पथकाने त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. न्यायालयाकडून प्रवासी कोठडी (ट्रान्झिट रिमांड) मिळवून पोलिसांचे पथक भुवनेश्वरला रवाना झाले आहे.
2018 पासून पाकिस्तानी नागरिकाच्या संपर्कात
आरोपी अभिजित जांबुरे 2018 पासून पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात होता. तो समाजमाध्यमातील संदेश यंत्रणेद्वारे फैसलाबाद खानकी येथील दानिश अलिस सय्यद दानिस अली नक्वी याच्या संपर्कात होता. दानिशने अभिजितला अमेरिकेतील माहिती-तंत्रज्ञान कंपनीत काम करत (फ्री लान्सर) असल्याची बतावणी केली होती. अभिजितने त्याचा ई-मेल आणि सांकेतिक शब्द दानिशला दिला होता. दानिश अभिजितच्या सल्ल्यानुसार माहिती-तंत्रज्ञान कंपनीत काम करीत होता. दानिशला मिळणारी रक्कम तो अभिजितच्या भारतातील खात्यात जमा करत असल्याची माहिती तपासात मिळाली आहे.








