वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सध्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ भारताच्या दौऱयावर चार सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने भारताने केवळ तीन दिवसात जिंकून ऑस्ट्रेलियावर 2-0 अशी आघाडी मिळविली आहे. आता या मालिकेतील 1 मार्चपासून इंदूरमध्ये खेळविल्या जाणाऱया तिसऱया कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स उपलब्ध होणार नसल्याने त्याच्या जागी स्टीव्ह स्मिथ संघाचे कर्णधारपद सांभाळेल.
गेल्या आठवडय़ात दुसरी कसोटी भारताने 6 गडय़ांनी जिंकल्यानंतर कमिन्स तातडीने मायदेशी रवाना झाला होता. त्याच्या कुटुंबातील सदस्य आजारी असल्याने त्याने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. तिसऱया कसोटीपूर्वी तो भारतात दाखल होईल, असे वाटत होते. पण तो इंदूरच्या कसोटीत खेळू शकणार नाही, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने जाहीर केले आहे. आता या तिसऱया कसोटीत स्टीव्ह स्मिथकडे संघाचे कर्णधारपद राहील. घरगुती समस्येमुळे कमिन्सला कदाचित चौथ्या कसोटीलाही मुकावे लागेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. स्टीव्ह स्मिथने आतापर्यंत तिसऱयांदा कसोटीत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आहे. 2021 साली तो ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार होता. त्यावेळी टिम पेनीकडे ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व सोपविण्यात आले होते. 2021 नंतर पॅट कमिन्सची ऑस्ट्रेलियन संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. भारताविरुद्धची दुसरी कसोटी संपल्यानंतर स्टीव्ह स्मिथ आपल्या पत्नीसह दुबईला गेला होता. गुरुवारी तो पुन्हा भारतात दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ अद्याप दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर सराव करीत असून रविवारी हा संघ इंदूरकडे रवाना होईल.
ऑस्ट्रेलियन संघातील अष्टपैलू कॅमेरून ग्रीन तिसऱया कसोटीसाठी पूर्ण तंदुरुस्त राहील, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने सांगितले. भारताविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात दुखापतीमुळे ग्रीन सहभागी होऊ शकला नव्हता. ग्रीनच्या समावेशामुळे ऑस्ट्रेलियन संघाची गोलंदाजी थोडीफार भक्कम होण्यास मदत होईल. ग्रीन हा उपयुक्त फलंदाजही असून त्याचा लाभ ऑस्ट्रेलियन संघाला होऊ शकेल. ऑस्ट्रेलियन संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क तिसऱया कसोटीसाठी उपलब्ध होणे अपेक्षित आहे. तो उपलब्ध झाल्यास त्याला कमिन्सच्या जागी थेट अंतिम अकरा खेळाडूत प्रवेश दिला जाईल.









