वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीतर्फे पुरूष आणि महिला विभागातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूंची निवड प्रत्येक महिनाअखेर केली जाते. विविध स्पर्धांतील प्रत्येक क्रिकेटपटूंच्या कामगिरीचा आढावा घेतला जातो. 2023 डिसेंबर महिन्यातील या पुरस्कारासाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याची पुरूष विभागात तर भारताची अष्टपैलू दीप्ती शर्मा हिची महिला विभागात सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली आहे.
कर्णधार पॅट कमिन्सने 2023 च्या क्रिकेट हंगामामध्ये ऑस्ट्रेलियन संघाला अनेक महत्त्वाच्या स्पर्धा जिंकून दिल्या आहेत. भारतात झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने अजिंक्यपद मिळविले होते. क्रिकेटच्या विविध प्रकारामध्ये 2023 हे वर्ष ऑस्ट्रेलियाला सर्वात यशस्वी ठरले आहे. त्याचप्रमाणे पाक विरूद्ध कसोटी मालिका जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार कमिन्सने मेलबर्नच्या दुसऱ्या कसोटीत एकूण 10 गडी बाद केले होते. सांघिक कामगिरीच्या जोरावरच ऑस्ट्रेलियाने पाक विरूद्धची कसोटी मालिका जिंकली, अशी प्रतिक्रिया कमिन्सने व्यक्त केली. आता ऑस्ट्रेलियन संघाच्या आगामी कसोटी मालिका विंडीज आणि न्यूझीलंड विरुद्ध होणार आहेत.
भारतीय महिला क्रिकेट क्षेत्रातील नवोदित अष्टपैलू दीप्ती शर्माने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकांमध्ये आपल्या कामगिरीत सातत्य राखले. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेली एकमेव कसोटी भारताला जिंकून देण्यात दिप्ती शर्माचा वाटा महत्त्वाचा ठरला.
डिसेंबर 2023 च्या पुरस्कार शर्यतीमध्ये पुरूष विभागात पॅट कमिन्सला बांगलादेशचा ताजुल इस्लाम आणि न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स यांचाही समावेश होता. पण कमिन्सने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत हा पुरस्कार पटकाविला. महिलांच्या विभागात दिप्ती शर्माला भारताची जेमिमा रॉड्रीग्ज आणि झिंबाब्वेची मॅरेंझी यांच्याकडून प्रतिकार होता. पण दीप्ती शर्माने आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर हा पुरस्कार मिळविला.









