पंजाबमधील मोहाली न्यायालयाचा निर्णय : 7 वर्षांनी पीडितेला न्याय
वृत्तसंस्था/ मोहाली
स्वयंघोषित पाद्री बजिंदरला मोहाली येथील पॉक्सो न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मागील आठवड्यात न्यायालयाने पाद्री बजिंदर सिंहला 2018 मधील लैंगिक शोषण प्रकरणी भादंविचे कलम 376 (बलात्कार), 323 (ईजा पोहोचविणे) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत दोषी ठरविले होते. बजिंदर हा एक मनोरुग्ण असून तो तुरुंगातून बाहेर पडल्यावर हाच गुन्हा करेल, याचमुळे तो तुरुंगातच रहावा अशी माझी आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे अनेक पीडितांचा विजय झाला आहे. आमची सुरक्षा सुनिश्चित करावी, कारण आमच्या हल्ला होण्याची शक्यता असल्याचे पीडितेने पंजाबच्या पोलीस महासंचालकांनी उद्देशून म्हटले आहे.
पीडितेच्या पतीने न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. आम्ही या खटल्यासाठी 7 वर्षांपर्यंत संघर्ष केला, बजिंदर हा न्यायालयाची दिशाभूल करत विदेशात प्रवास करत होता, तर न्यायालयाने त्याना विदेशात जाण्यास मनाई केली होती. माझ्यावर बनावट एफआयआर नोंदविण्यात आला, आमच्यावर हल्ला करण्यात आला. मी सहा महिने तुरुंगात घालवे आणि मग त्याला शिक्षा मिळवून देण्याचा निर्धार केला. आम्हाला न्यायपालिकेवर भरवसा होता. लैंगिक शोषण प्रकरणी 6 आरोपी होते. यातील 5 जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे, पाद्री बजिंदरला दोषी ठरविण्यात आले असून आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो असे पीडितेच्या पतीने म्हटले आहे.
जीरकपूरच्या एका महिलेने 2018 साली बजिंदरने विदेशात स्थायिक करविण्याचे प्रलोभन दाखवत लैंगिक शोषण केल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदविली होती. बजिंदरने लैंगिक शोषणाचे चित्रिकरण करत पीडितेला ब्लॅकमेल केले होते. जेव्हा ही घटना घडली होती, तेव्हा पीडिता अल्पवयीन होती. याचमुळे या प्रकरणी पॉक्सो न्यायालयात सुनावणी पार पडली. जीरकपूर पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीच्या आधारवर चमत्काराद्वारे आजार बरे करण्याचा दावा करणारा पाद्री बजिंदर सिंह समवेत एकूण 6 जणांवर गुन्हा नोंदविला होता.
याप्रकरणी पाद्री बजिंदरसोबत अकबर भट्टी, राजेश चौधरी, सुच्चा सिंह, जतिंदर कुमार, सितार अली आणि संदीप उर्फ पहलवान हे आरोपी होते. बजिंदर वगळता अन्य आरोपींची न्यायालयाने पुराव्यांअभावी मुक्तता केली. ताजपूर गावातील द चर्च ऑफ ग्लोरी अँड विस्डमचा पाद्री बजिंदरने जालंधरमध्ये अल्पवयीन पीडितेचे लैंगिक शोषण केले होते. बजिंदरने पीडितेचा मोबाइल क्रमांक मिळवत तिला अश्लील मेसेज पाठविण्यास सुरुवात केली होती. तसेच चर्चमधील स्वत:च्या केबिनमध्ये तिच्यासोबत तो आक्षेपार्ह वर्तन करत होता असे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद आहे. कपूरथळा पोलिसांनी याप्रकरणी विशेष तपास पथक नेमले होते. बजिंदरला जुलै 2018 मध्ये दिल्ली विमानतळावर लंडनला जाणाऱ्या विमानात सवार होण्याचा प्रयत्न करताना अटक करण्यात आली होती.









