मोहालीच्या पॉक्सो न्यायालयाचा निर्णय
वृत्तसंस्था/ मोहाली
पंजाबच्या मोहाली येथील पॉक्सो न्यायालयाने 2018 च्या जीरकपूर लैंगिक शोषण आणि बलात्कार प्रकरणी पाद्री बजिंदर सिंहला दोषी ठरविले आहे. न्यायालय 1 एप्रिल रोजी याप्रकरणी बजिंदरला शिक्षा सुनावणार आहे. बजिंदर अंतिम सुनावणीसाठी 6 अन्य आरोपींसह मोहालीच्या पॉक्सो न्यायालयासमोर शुक्रवारी हजर राहिला. अन्य 5 आरोपींना न्यायालयाने पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केले आहे. हे प्रकरण 2018मध्ये जीरकपूर येथील एका महिलेच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांशी निगडित आहे. पाद्री बजिंदरला जुलै 2018 मध्ये दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली होती. त्यावेळी तो लंडनला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता.
चमत्काराद्वारे आजार बरे करण्याचा दावा करणारा जालंधर येथील पादी बजिंदर सिंह समेत एकूण 7 जणांच्या विरोधात पीडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. याप्रकरणी पाद्री बजिंदरसोबत अकबर भट्टी, राजेश चौधरी, सुच्चा सिंह, जतिंदर कुमार, सितार अली आणि संदीप उर्फ पहलवान हे आरोपी होते.
ताजपूर गावातील ‘द चर्च ऑफ ग्लोरी अँड विस्डम’चा पाद्री बजिंदर सिंहने जालंधरमध्ये अल्पवयीन पीडितेचे लैंगिक शोषण केले होते. बजिंदरने तिचा मोबाइल क्रमांक मिळवत तिला अश्लील संदेश पाठविण्यास सुरुवात केली होती. बजिंदर तिच्यासोबत आक्षेपार्ह वर्तन करत होता. कपूरथळा पोलिसांनी या आरोपाप्रकरणी विशेष तपास पथक नेमले होते.
जालंधरमध्येही बलात्काराचे प्रकरण
बजिंदरवर काही दिवसांपूर्वी जालंधरमध्ये देखील अन्य एका 22 वर्षीय महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. याप्रकरणी सध्या कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. बजिंदर अलिकडेच एका व्हिडिओत एका महिलेला मारहाण करताना दिसून आला होता.









