वृत्तसंस्था / कोलकाता
पश्चिम बंगाल राज्यात घडलेला अनेक कोटी रुपयांचा ‘पासपोर्ट’ घोटाळा उघडकीस आणण्यात आला आहे. केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणी मोठी कारवाई केली असून राज्यात 50 स्थानांवर धाडी टाकून पुरावा गोळा केला. शनिवारी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी 24 जणांवर गुन्हा सादर करण्यात आला असून सविस्तर चौकशीचा प्रारंभ करण्यात आला आहे.
गुन्हा सादर करण्यात आलेल्या 24 जणांमध्ये प्रामुख्याने सरकारी अधिकारी आणि खासगी व्यक्तींचा समावेश आहे. या सर्वांना आरोपी करण्यात आले आहे. यांच्यापैकी 16 जण सरकारी अधिकारी असून ते खोट्या आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट देण्याचे काम करीत होते, असे स्पष्ट झालेले आहे. अपात्र व्यक्तींनाही अशा प्रकारे पासपोर्ट दिले जात होते. तसेच जे लोक भारताचे नागरीकही नाहीत, अशांनाही भारताचा पासपोर्ट दिला जात होता, असे दिसून आल्याने सीबीआयने ही मोठी कारवाई केली. हे अधिकारी लक्षावधी रुपयांची लाच घेऊन बनावट पासपोर्ट देत होते, अशी माहिती सीबीआयने दिली आहे. या प्रकरणी, एक पासपोर्ट अधिकारी, एक ज्येष्ठ पर्यवेक्षक आणि एक मध्यस्थ हे सूत्रधर आहेत. इतर आरोपी साहाय्यक आणि लाभार्थी आहेत, असा आरोप आहे.