राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून विशेष अॅप
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
राष्ट्रीय महामार्गावर प्रवासादरम्यान पेट्रोल पंप, टोलनाका किंवा गरज भासल्यास रुग्णालय किती अंतरावर आहे हे आता कुणालाच विचारण्याची गरज भासणार नाही. तसेच महामार्गाच्या पुढील भागात हवामान कशाप्रकारचे असेल हेदेखील प्रवाशांना समजणार आहे. प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास मदत त्वरित मिळणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रवासात असलेल्या लोकांसाठी एक नवी सुविधा उपलब्ध केली आहे. प्राधिकरणाने मोबाइल अॅप्लिकेशन ‘राजमार्गयात्रा’ सादर केले आहे. वाहनचालक या अॅपला गूगल प्ले स्टोअर आणि आयओएस अॅप स्टोअर दोन्हींवरून डाउनलोड करू शकतात. प्रवाशांना विविध प्रकारची माहिती पुरविण्यासह त्यांच्या तक्रारींचे निवारण हा अॅप करणार आहे. हा अॅप सध्या हिंदी आणि इंग्रजीत उपलब्ध आहे.
राजमार्गयात्रा राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना एक स्थानावर आवश्यक माहिती उपलब्ध करविण्याचे काम करणार आहे. वास्तविक वेळेतील हवामानाची स्थिती, नजीकचा टोलनाका, पेट्रोल पंप, रुग्णालय, हॉटेल आणि अनय आवश्यक सेवांबद्दल माहिती अॅपकडून मिळणार आहे. प्रवासादरम्यान समस्या उद्भवल्यास या अॅपच्या मदतीने निवारण केले जाणार आहे. वापरकर्ते जियो-टॅग करण्यात आलेले व्हिडिओ किंवा फोटो संलग्न करून सहजपणे महामार्गाशी निगडित मुद्दे कळवू शकतात. नोंदणीकृत तक्रारींवर कालबद्ध पद्धतीने पावले उचलली जाणार आहेत. विलंब झाल्यास सिस्टीम-जनरेटेड प्रकरणाला वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत मांडले जाणार आहे. वापरकर्ते पूर्ण पारदर्शकतेसाठी स्वत:च्या तक्रारींच्या स्थितीला ट्रॅकही करू शकतात. राजमार्गयात्रा अॅपने स्वत:च्या सेवांना विविध बँक पोर्टल्सशी जोडले आहे. यामुळे वापरकर्ते एकाच प्लॅटफॉर्मवर स्वत:च्या फास्टॅगला सहजपणे रिचार्ज करू शकतात, मासिक पास मिळवू शकतात आणि फास्टॅग संबंधित अन्य बँकिंग सेवा सहजपणे मिळवू शकतात.









