डब्यांची संख्या कमी केल्याने गैरसोय : जनरल-स्लीपर कोच वाढविण्याची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
वास्को-निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेसला काही दिवसांपूर्वीच एलएचबी हे अत्याधुनिक कोच जोडण्यात आले. परंतु यामुळे स्लीपर व जनरल डब्यांची संख्या कमी झाली आहे. याचा परिणाम एक्स्प्रेसमध्ये दररोज प्रवाशांची चेंगराचेंगरी होत आहे. जनरल क्लासमधील प्रवासी स्लीपर व एसीमध्येही प्रवेश करत असल्यामुळे इतर प्रवाशांची वादावादी व हाणामारीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे गोवा एक्स्प्रेसच्या स्लीपर कोचमध्ये वाढ करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.
गोवा, बेळगाव व मिरज भागातून दररोज दिल्लीला जाणारी गोवा एक्स्प्रेस ही एकमेव रेल्वे आहे. राजधानी दिल्लीला प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच ही लांबपल्ल्याची गाडी असल्याने नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. बेळगाव हे मध्यवर्ती शहर असल्यामुळे रेल्वेप्रवाशांची संख्या मोठी आहे. बेळगावमध्ये एअर फोर्स, मराठा लाईट इन्फंट्री, आयटीबीपी, सीआरपीएफ यासारख्या लष्कर व निमलष्करी दलांचे तळ असल्यामुळे दिल्लीला अनेकांची ये-जा असते. वास्कोमधून गोवा एक्स्प्रेस निघत असल्यामुळे बेळगावकरांना ती सोयीस्कर ठरते.
गोवा एक्स्प्रेसला यापूर्वी 4 थ्री टायर एसी, 1 टू टायर एसी, 9 स्लीपर तर 4 जनरल कोच होते. 15 जूनपासून यामध्ये बदल करण्यात आला. नव्या एक्स्प्रेसमध्ये 1 फर्स्ट क्लास एसी, 2 सेकंड क्लास एसी, 4 थर्ड क्लास एसी, 5 थ्री टायर ईकॉनॉमी एसी, 2 स्लीपर, 2 जनरल व 2 गार्ड बोगी जोडण्यात आल्या आहेत.
गोवा, बेळगाव, मिरज, सांगली, सातारा येथून पुणे व उत्तर भारतात जाण्यासाठी प्रवासी या रेल्वेचा वापर करतात. यापूर्वी 9 स्लीपर कोच असल्याने प्रवाशांना त्वरित बुकिंग मिळत होते. परंतु स्लीपर कोचची संख्या कमी केल्यामुळे बुकिंग मिळणे अवघड झाले आहे. याचबरोबर जनरल डब्यांची संख्या 4 वरून 1 वर आणल्याने जनरलमधील प्रवासी चेंगराचेंगरी करीत आहेत. त्यामुळे रेल्वेला पूर्ववत स्लीपर कोच व जनरल कोच जोडण्याची मागणी केली जात आहे.
जनरलच्या प्रवाशांचा स्लीपर-एसी कोचमध्ये प्रवेश
लांबपल्ल्याचा प्रवास करावा लागणार असल्याने महिनाभर पूर्वीपासूनच प्रवाशांचे बुकिंग सुरू असते. परंतु प्रत्यक्ष रेल्वेमध्ये प्रवाशांना वाईट अनुभव येत आहेत. जनरल डब्यांची संख्या कमी केल्याने हे प्रवासी स्लीपर व एसी डब्यांमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे आरक्षण केलेल्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सोसावा लागत आहेत. काहीवेळा टीसीकडून दंडदेखील ठोठावला जात आहे. त्यामुळे डब्यांची संख्या वाढविल्यास प्रवाशांची गैरसोय थांबणार आहे.









