वार्ताहर/ उचगाव
उचगाव ऍप्रोच रोड तसेच बेळगाव-वेंगुर्ले मार्गावर दोन झाडे पूर्णतः वाळलेली असल्याने धोकादायक बनली होती. ती तातडीने हटवावीत, अशा आशयाचे वृत्त तरुण भारतमधून प्रसिद्ध होताच वन खात्याने व सार्वजनिक बांधकाम खात्याने याची त्वरित दखल घेऊन सदर झाडे हटविली. वाहनधारकांतून व नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
वाळलेली झाडे हटविण्यासंदर्भात अनेकवेळा वन खात्याकडे तक्रारी देऊनदेखील याकडे साफ दुर्लक्ष झाले होते. यासाठी नागरिकांतून तक्रारी वाढल्या होत्या. झाड कोसळून दुर्घटना घडण्यापूर्वी सदर झाडे काढावीत, अशी मागणी होती. याविषयीचे वृत्त प्रसिद्ध होताच सदर दोन्ही झाडे सार्वजनिक बांधकाम खाते आणि वन खाते यांच्यावतीने दोन दिवसांत काढल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तरुण भारतमधून सदर वृत्त प्रसिद्ध करुन या खात्याला जाग आणण्यात आली व होणारा धोका टळला. त्यामुळे तरुण भारतचेही नागरिकांनी आभार मानले.









