खेड :
कोकण मार्गावरुन धावणाऱ्या ११ रेल्वेगाड्यांच्या प्रवाशांची मंगळवारी रखडपट्टी झाली. जामनगर एक्सप्रेसला तब्बल ८ तासांचा लेटमार्क मिळाला. एर्नाकुलम-पुणे एक्सप्रेसही ६ तास विलंबाने धावली. अन्य ९ रेल्वेगाड्यांच्या सेवांवरही परिणाम झाला. विस्कळीत वेळापत्रकाचा प्रवाशांना फटका बसला.
मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वेगाड्यांच्या सेवांवरही झाला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बिघडले आहे. मंगळवारीही बिघडलेल्या वेळापत्रकाने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. कोईमतूर-जबलपूर स्पेशल ४ तास ५० मिनिटे तर मंगळूर-उधना स्पेशल २ तास ४० मिनिटे उशिराने मार्गस्थ झाली.
सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्सप्रेस २ तास १० मिनिटे तर एलटीटी-मडगाव एक्सप्रेस १ तास २० मिनिटे उशिराने मार्गस्थ झाली. निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस १ तास तर एलटीटी-तिरुवअनंतपूरम ४ तास २५ मिनिटे विलंबाने रवाना झाली. सावंतवाडी-दिवा पॅसेंजरसह सीएसएमटी-मडगाव तेजस एक्सप्रेस १ तास विलंबाने धावली. रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बिघडण्याचे नेमके कारण समजू शकले नाही.
‘मडगाव-एलटीटी’चा ‘लेटमार्क’ कायम कोकण मार्गावरून धावणारी एलटीटी-मडगाव एक्सप्रेस गेल्या आठवडाभरापासून स्थानकातून उशिरानेच सुटत असल्याने प्रवाशांना तिष्ठत रहावे लागत आहे. मंगळवारी १११०० क्रमांकाची मडगाव एक्सप्रेस परतीच्या प्रवासात ३ तास ३० मिनिटे उशिराने धावली. सकाळी १२.३० वाजता सुटणारी एक्सप्रेस सायंकाळी ४ वाजता सुटल्याने प्रवासी मडगाव स्थानकात खोळंबले.








