बसस्थानकात प्रवासी अधिक, प्रवाशांना करावा लागतो गैरसोयींचा सामना
बेळगाव : मध्यवर्ती बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. आसनाअभावी प्रवाशांना उन्ह-पावसात ताटकळत थांबावे लागत आहे. त्यामुळे स्मार्ट बसस्थानकात प्रवाशांना सुविधा मिळत नसल्याची बाब दिसून येते. 11 जूनपासून शक्ती योजनेंतर्गत महिलाचा मोफत प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे महिला प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. दरम्यान मध्यवर्ती बसस्थानकात प्रवासी संख्या अधिक प्रमाणात वाढली आहे. मात्र आसने कमी पडू लागल्याने प्रवाशांना भर रस्त्यात थांबावे लागत आहेत. त्यामुळे बस वाहतुकीलादेखील अडथळा निर्माण होऊ लागला आहे.
बसस्थानकात आसन व्यवस्था करा
मध्यवर्ती बसस्थानकातून दररोज 650 हून अधिक बसेस विविध ठिकाणी धावत आहेत. मोफत प्रवासामुळे बाहेर पडणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. पर्यटन आणि धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. मात्र बसस्थानकात सुविधा मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. आसनाअभावी प्रवाशांना बस थांबा सोडून बाहेर इतरत्र बसावे लागत आहे. त्यामुळे बसस्थानकात आसनाची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.









