रेल्वेकडून सुविधा सुरू : सध्या निवडक रेल्वेस्थानकांवर प्रारंभ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात दररोज सुमारे 11 हजार रेल्वेगाड्यांचे संचालन केले जाते आणि कोट्यावधी लोक रेल्वेप्रवास करत असतात. मोठ्या संख्येत लोक जनरल डब्यांमधून प्रवास करतात. एसी क्लासमध्ये प्रवाशांसाठी पँट्री कारची सुविधा असते, पंरतु जनरल क्लासमध्ये अशाप्रकारची कुठलीच सुविधा नसते. याचमुळे अशा प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. परंतु आता रेल्वेने जनरल क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांसाठी विशेष सुविधा सुरू केली आहे. या प्रवाशांना केवळ 20 रुपयांमध्ये भोजन पुरविले जात आहे.
रेल्वेने सध्या 51 स्थानकांवर ही सुविधा सुरू केली आहे, तर अनेक स्थानकांवर लवकरच ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे खाद्यपदार्थांचा स्टॉल प्लॅटफॉर्मवर अशा ठिकाणी असणार आहे, जेथे जनरल क्लासचे डबे थांबत असतात. हे भोजन आयआरसीटीसीच्या किचन युनिट्समधून पुरविले जाणार आहे. यात रिफ्रेशमेंट रुम्स आणि जन आधार सामील आहे. 20 रुपयांमध्ये प्रवाशांना 7 पुऱ्या, बटाट्याची भाजी आणि लोणचे देण्यात येणार आहे.
रेल्वे बोर्डाने सर्व विभागीय रेल्वेंना याविषयी व्यवस्था करण्याची सूचना केली आहे. या सुविधेला एक्सटेंडेड सर्व्हिस काउंटर्स नाव देण्यात आले आहे. 6 महिन्यांपासून ही सुविधा प्रायोगिक तत्वावर पुरविली जात होती. आयआरसीटीसी झोन्सना किचन युनिट्सद्वारे ही सुविधा पुरविण्यास सांगण्यात आले आहे. तर विभागीय रेल्वेंना याप्रकरणी समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
जनरल क्लासमध्ये प्रवाशांची सुविधा विचारात घेत भोजनाची किंमत अत्यंत कमी ठेवण्यात आली आहे. 20 रुपयांमध्ये हे भोजन प्रवाशांना पुरविले जात आहे. तर कॉम्बो ऑफर अंतर्गत 50 रुपयांमध्ये राजमा/छोले, खिचडी/पोंगल, कुलचे/भटूरे, पावभाजी आणि मसाला डोसा मिळत आहे. याचबरोबर लोकांना केवळ तीन रुपयांमध्ये पाण्याचा 200 मिलीचा पॅक्ड ग्लास पुरविण्यात येत आहे. सर्वसाधारणपणे स्थानकांवर पाण्याची बाटली 15 रुपयांमध्ये मिळते.
रेल्वेनुसार प्लॅटफॉर्मवर जनरल क्लास डब्यांनजीक भोजनाचा काउंटर स्थापन करण्यात येईल. याकरता विभागीय रेल्वेंना जागा निश्चित करण्यास सांगण्यात आले आहे. उत्तर विभागामध्ये फुलेरा, अजमेर, रेवाडी, आबू रोड, नागपूर, जयपूर, अलवर, उदयपूर आणि मथुरा येथे ही व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. याचबरोबर पूर्व झोनमध्ये दुर्गापूर, आसनसोल, सियालदह, मधुपूर, जसीडीह, बालासोर, खडगपूर, हिजली, न्यू कूचबिहार, न्यू अलीपुरद्वार, कटिहार, न्यू तिनसुकिया, कामाख्या, धनबाद, रक्सौल, समस्तीपूर, बेतिया, नरकटियागंज, कियूल, बक्सर, मोकामा, बख्तियारपूर, टाटानगर, झारसुगुडा आणि रांचीमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. पुणे, बेंगळूर, मनमाड येथेही ही सुविधा उपलब्ध झाली आहे.









