भररस्त्यात बंद पडण्याचे प्रकार : परिवहनच्या ताफ्यात जुन्या बसचा भरणा
बेळगाव : परिवहनच्या ताफ्यात जुन्या बसेसचा भरणा अधिक असल्याने रस्त्यात बंद पडण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बससेवा विस्कळीत होऊ लागली आहे. बसेस नादुरुस्तचे प्रमाण वाढत असल्याने परिवहनची डोकेदुखीही वाढली आहे. मागील चार दिवसात आंबेवाडी, मण्णूर आणि बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर हिंडलगानजीक रस्त्यात बस बंद पडण्याचे प्रकार घडले. या प्रकारामुळे प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिवहनच्या ताफ्यात आयुर्मान संपलेल्या आणि भंगारात काढलेल्या बसेसचा भरणा आहेत. त्यामुळे प्रवासादरम्यान या जुन्या बसेस भररस्त्यात बंद पडू लागल्या आहेत. टायर पंक्चर होणे, बस बंद होणे, धूर सोडणे, टायर फुटणे आदी प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षाही ऐरणीवर येऊ लागली आहे. विशेषत: ग्रामीण भागात बसेस बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत. रात्री उशिराने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. काहीवेळेला प्रवाशांना पायी चालत घर गाठावे लागत आहे.
मध्यवर्ती बसस्थानकातून दररोज 650 हून अधिक बसेस विविध मार्गांवर धावतात. मात्र यापैकी दीडशेहून अधिक बसेस आर्युमान संपलेल्या आहेत. त्यामुळे प्रवासादरम्यान बसेसच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. भररस्त्यात बसेस बंद पडत असल्याने प्रवाशीही हैराण होऊ लागले आहेत. गतवर्षी बिजगर्णी मार्गावर टायर फुटून बसची दुर्घटना घडली होती. सुदैवाने यामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र यंदा पावसाळ्यात बसेस नादुरुस्तीचे प्रमाण वाढले आहे. विविध मार्गांवर बसेस नादुरुस्त होऊन रस्त्यात बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बससेवेचे तीनतेरा वाजू लागले आहेत. आधीच शक्ती योजनेमुळे बससेवा विस्कळीत झाली आहे. त्यातच परिवहनच्या ताफ्यात जुन्या बस अधिक असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. ग्रामीण भागात रात्री उशिराने वसतीसाठी धावणाऱ्या बसेस विविध ठिकाणी बंद पडण्याचे प्रकार या आठवडाभरात वाढले आहेत. त्यामुळे रात्री उशिराने प्रवास करणे धोकादायक ठरू लागले आहे. परिवहन सुरळीत बससेवा देऊन प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेणार का? असा प्रश्नही सर्वसामान्य प्रवाशांनी केला आहे.









