गाडी पलटी होऊन देखील किरकोळ जखमी
वार्ताहर/कणकुंबी
गोव्याहून बेळगावकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन पलटी होऊन झालेल्या अपघातात एका लहान मुलांसह तीन-चार प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना जांबोटीजवळ रविवारी दुपारी घडली. बेळगाव-चोर्ला-गोवा या अरुंद रस्त्यामुळे वाहनांच्या अपघातांची संख्या वाढत चालली आहे. रविवारी गोव्याहून बेळगावकडे जाणाऱ्या बागलकोट येथील कारगाडीमध्ये चार-पाच प्रवासी होते. कालमणी, जांबोटी दरम्यानच्या एका छोट्या वळणावर समोरून येणाऱ्या एका वाहनाला चुकविण्याच्या नादात वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे गाडी दहा ते पंधरा फूट घासत जाऊन गटाराच्या बाजूला पटली होऊन पडली. मात्र सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडले. सदर अपघाताची माहिती जांबोटी पोलिसांना कळविण्यात आली. जांबोटी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.









