गुऊवारीही गैरसोय, पाच तास प्रवासी ताटकळत
बेळगाव : विमान फेरी रद्द केल्याबद्दल जाब विचारणाऱ्या प्रवाशांवरच अरेरावीचा प्रयत्न गुऊवारी सांबरा विमानतळावर झाला. प्रवाशाने व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या अंगावर अधिकारी धावून गेला. यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. बेळगावच्या प्रवाशांना वारंवार मनस्ताप होत असताना लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प असल्याने संतापाची लाट पसरली आहे. देशातील सर्वात जुन्या विमानतळांमध्ये बेळगावचा समावेश होतो. अनेक महत्त्वाच्या शहरांना बेळगावमधून विमानसेवा उपलब्ध असल्याने पश्चिम महाराष्ट्र, कोकण व उत्तर कर्नाटकातील शेकडो प्रवासी विमानाने येथून प्रवास करतात. परंतु एका विमान कंपनीच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांना कटू अनुभव येत आहेत. गुऊवारी असाच प्रकार घडला आणि प्रवाशांवरच अरेरावी केल्याचा व्हिडिओ समोर येत आहे.
20 जानेवारी रोजी बेळगाव-जयपूर स्टार एअरचे विमान तांत्रिक कारण देत रद्द केले. विमानातील प्रवाशांना पुन्हा माघारी पाठविले. काही प्रवासी वैद्यकीय उपचार तर काही लष्करी जवान सुटी संपवून सेवा बजाविण्यासाठी जात होते. या प्रवाशांसाठी गुऊवार दि. 23 रोजी प्रवासाची संधी देण्यात आली. सकाळी 11 वाजता प्रवाशांना बोलावले होते. विमान उशिरा येईल, असे नंतर सांगण्यात आले. पुढे दुपारी तीनची वेळ दिली. यामुळे प्रवासी विमानतळावरच थांबून होते. दुपारी चार व त्यानंतर पाच अशी वेळ बदलण्यात आली. यामुळे एका प्रवाशाने जाब विचारला. परंतु त्याच्यावरच अरेरावी करण्यात आली. एका अधिकाऱ्याने प्रवाशाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. यावरून बेळगावच्या विमानसेवेचे पुरते तीनतेरा वाजल्याचे चित्र दिसून आले.
बेळगाव-नागपूर विमान रद्द
जयपूर विमान रद्द केल्याने प्रवाशांचा गोंधळ सुरू असतानाच बेळगाव-नागपूर विमानही गुऊवारी रद्द करण्यात आले. यामुळे प्रवाशांचा संताप अनावर झाला. परगावची एक महिला बेळगावमधून नागपूरला जाणार होती. तिने आपल्याला बेळगावमध्ये राहण्याची सोय विमान कंपनीने करावी, अशी विनंती केली. परंतु स्टार एअरच्या अधिकाऱ्यांनी हात वर केले.









