जयपूरला जाणाऱ्या विमानात बिघाड : सांबरा विमानतळावरील प्रकाराने प्रवाशांची गैरसोय
बेळगाव : बेळगावहून जयपूरला जाणारे विमान तांत्रिक बिघाडाने अचानक रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. विमान रद्द केल्याने प्रवाशांना पुढील सर्व कार्यक्रम रद्द करावे लागल्याने विमानतळावर काहीकाळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. एकाच विमान कंपनीकडून वारंवार विमाने रद्द केली जात असल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला होता. स्टार एअरलाईन्स कंपनीचे विमान सोमवारी बेळगावहून जयपूरला जाणार होते. विमान निघण्यापूर्वी दीड ते दोन तास आधी प्रवासी विमानतळावर दाखल झाले.
चेक ईन करून सामानाची सर्व तपासणी करून रन वे वर आलेल्या विमानामध्ये प्रवासी बसलेदेखील होते. परंतु, इंजिनमध्ये बिघाड झाल्याने विमान सुरू होत नव्हते. दुरुस्तीसाठी विलंब होणार असल्याने प्रवाशांना तात्काळ विमानातून उतरण्याची सूचना करण्यात आली. दुरुस्ती लवकर झाल्यास विमान मार्गस्थ होईल, अशी आशा प्रवाशांना होती. परंतु, पर्यायी विमानसेवा उपलब्ध न झाल्याने स्टार एअरलाईन्सने विमान रद्द केल्याची घोषणा केली. यामुळे प्रवाशांचा राग अनावर झाला. अनेकांनी विमानाने जाऊन पुढील हॉटेल, तसेच प्रवासाचे बुकिंग केले होते. परंतु, हे सर्वच प्रवाशांना रद्द करावे लागले. यामुळे प्रवासी व विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये काहीकाळ वादावादी झाली.
इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे विमान रद्द
विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे जयपूरला जाणारे विमान रद्द करावे लागले. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. परंतु, इंजिनमध्येच बिघाड झाल्यामुळे विमान रद्द केल्याशिवाय पर्याय नव्हता.
– त्यागराजन (संचालक, बेळगाव विमानतळ)









