ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यात ट्रॅव्हल्स चालकाने एका प्रवाशी महिलेचे अपहरण करुन तिच्यावर दोन वेळा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी ट्रॅव्हल्स चालक नवनाथ शिवाजी भोंग (वय 38, रा. इंदापूर) याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित 21 वर्षीय महिला वाशिम जिल्ह्यातील आहे. शनिवारी (दि.11) ती आपल्या पतीसह कामाच्या शोधात पुण्यात आली होती. रात्री 11 च्या सुमारास हे दाम्पत्य स्वारगेट परिसरात झोपण्यासाठी जागा शोधत होते. त्यावेळी आरोपी भोंग याने या दाम्पत्याला तुम्ही माझ्या ट्रॅव्हल्समध्ये झोपा, एवढय़ा रात्री कुठे झोपायला जागा मिळणार असे सांगितले. हे दाम्पत्यही भोंग याच्या सांगण्यानुसार त्याच्या ट्रॅव्हल्समध्ये झोपले. काही वेळात पीडित महिलेचा पती लघुशंकेसाठी ट्रॅव्हल्समधून बाहेर आला. त्यावेळी भोंग याची नियत फिरली आणि तो गाडी चालू करून स्वारगेटमधून निघाला. महिलेने आरडा-ओरड केली पण त्याने जीवे मारण्याची धमकी दिली.
स्वारगेटजवळच्या फुटपाथच्या बाजूला ट्रॅव्हल्स थांबवून आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने ट्रॅव्हल्स कात्रजच्या दिशेने नेली. कात्रज बस स्टॉप जवळील कॅनॉल फुटपाथच्या बाजूला ट्रव्हल्स थांबवून पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडित महिलेला त्याने बसमधून खाली उतरवले आणि आरोपी पसार झाला. दरम्यान, महिलेचा तिला शोधत होता. ट्रॅव्हल्स आणि पत्नी न सापडल्याने त्याने पोलिसात धाव घेतली आणि त्यानंतर हा प्रकार उजेडात आला. स्वारगेट पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.









