उत्सवी काळामुळे मागणी वाढली, पश्चिम भारताचे योगदान अधिक
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
उत्सवी हंगामाच्या दृष्टीने पाहता वाहन उद्योगाला सप्टेंबर महिना हा वाहन विक्रीसाठी उत्तम ठरला आहे. कारण मागच्या महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री विक्रमी स्तरावर पोहचली आहे. आगामी काळातही विक्रीत वाढ असेल.
गेल्या सप्टेंबर महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री 3 लाख 63 हजार 733 इतकी राहिली होती, जी वर्षाच्या आधारावर पाहता 10 टक्के अधिक होती. याअंतर्गत जीएसटीतून प्राप्ती 1.6 ट्रिलीयन रुपये इतकी झाली आहे. मासिक तत्वावर पाहता प्रवासी वाहनांच्या विक्रीत 2.36 टक्के इतकी वाढ दिसली आहे. गणेशचतुर्थीपासून उत्सवी हंगामाला सुरुवात झाली असून वाहन खरेदीत वाढ दिसते आहे. हा सिलसिला आगामी काळातही दसरा, दिवाळीपर्यंत कायम राहणार आहे. चिपच्या उपलब्धतेमुळे वाहन निर्मितीत वाढ झाली आहे. यातही एसयुव्ही गटातील वाहनांच्या मागणीत झपाट्याने वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये 3 लाख 60 हजार 897 प्रवासी वाहनांची विक्री झाली होती. आर्थिक वर्षात पहिल्या सहा महिन्यात 20 दशलक्ष प्रवासी वाहनांची विक्री झाली आहे.
काय म्हणाले श्रीवास्तव
मारुती सुझुकी इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी (विपणन व विक्री) शशांक श्रीवास्तव म्हणाले की, उत्सवामुळे मागच्या महिन्यात कार विक्रीत लक्षणीय प्रतिसाद पाहायला मिळाला. पश्चिम भारतात कृष्ण जन्माष्टमी व गणेशोत्सव हे दोन सण उत्साहात साजरे करण्यात आले. यानिमित्ताने ग्राहकांनी कार खरेदीचा बेत पूर्ण केला आहे. आता नवरात्री व दिवाळीचा सण उत्तर, पूर्व, पश्चिम आणि मध्य भारतात साजरा होणार असून त्याकरीता वाहनांची उपलब्धता करण्यावर अनेक कंपन्यांचा भर दिसत आहे.