इंडोनेशियातील दुर्घटना : पाच जणांचा मृत्यू : मच्छिमारांकडून बचावकार्य
वृत्तसंस्था/ जकार्ता
इंडोनेशियामध्ये प्रवाशांनी भरलेल्या जहाजाला रविवारी भीषण आग लागली. आग लागल्यानंतर ‘केएम बार्सिलोना व्हीए’ जहाजात प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण झाली. लोक जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या मारू लागले. ही दुर्घटना उत्तर सुलावेसीमधील तालिस बेटाजवळ घडली. या जहाजातून 280 हून अधिक लोक प्रवास करत होते. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून कित्येक जण बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
आगीची घटना निदर्शनास येताच जवळपास असलेल्या मच्छिमार बोटींनी बचावकार्यासाठी धाव घेतल्याचे सांगण्यात आले. अनेक प्रवाशांनी आगीची संपूर्ण घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. दुपारी 1.30 वाजता जहाजात आग लागली. तथापि, आगीची कारणे अद्याप कळू शकलेली नाहीत. इंडोनेशियन शोध आणि बचाव पथकाने लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले.
या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये जहाजाच्या खालच्या डेकपासून वरपर्यंत काळा धूर निघताना दिसत आहे. काही मिनिटांतच आगीच्या ज्वाळा वरच्या डेकवर पोहोचल्या. त्यानंतर प्रवासी घाबरून इकडे तिकडे धावू लागले. अनेक प्रवाशांनी लाईफ जॅकेट घालून समुद्रात उड्या मारल्या, तर काही पालक आपल्या मुलांना हातात घेऊन जहाजावरच राहिले. संयुक्त बचाव पथक आणि स्थानिक मच्छिमारांच्या बोटींनी सुमारे 150 लोकांना सुरक्षितपणे वाचवल्याचे प्रांतीय शोध आणि बचाव कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी व्हेरी एरियान्टो यांनी सांगितले.









