बेळगाव : बेळगाव विमानतळावर बुधवारी ‘यात्री सेवा दिवस’ साजरा करण्यात आला. या निमित्ताने रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार जगदीश शेट्टर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यासह इतर उपस्थित होते. सांबरा येथील पीएमश्री केंद्रीय विद्यालय शाळेच्या विद्यार्थ्यांना एव्हिएशन क्षेत्रातील संधी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विमानतळावरील प्रवासी तसेच विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
खासदार जगदीश शेट्टर यांनी विमानतळावर दिल्या जाणाऱ्या सेवांबद्दल समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल कौतुक केले. प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विमानतळ संचालक त्यागराजन यांनी स्वागत केले. बेळगावच्या स्कायवर्ल्ड एव्हिएशनच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, स्कायवर्ल्ड एव्हिएशनचे सीईओ विनोद बामणे, विमानतळ प्राधिकरणचे अधिकारी व प्रवासी उपस्थित होते.









