दुपारच्या वेळेत बसस्थानकात शुकशुकाट
बेळगाव : शहर परिसरात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिक वाढत्या उन्हाने हैराण झाले आहेत. याचा परिणाम बस प्रवाशांवरही होऊ लागला आहे. दुपारच्यावेळेत बसस्थानकात प्रवाशांची संख्या रोडावत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे काही बसेस रिकाम्या धावू लागल्या आहेत. सकाळी, सायंकाळी बसेसना गर्दी असली तरी दुपारी मात्र बसेस प्रवाशाविना फिरू लागल्या आहेत. उष्म्यामुळे दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळले जात आहे. त्यामुळे प्रवासी संख्या कमी होऊ लागली आहे. त्याबरोबर दुपारी बस थांबे आणि बसस्थानकातही शुकशुकाट निर्माण होऊ लागला आहे. मध्यवर्ती बसस्थानकात नेहमीच हजारो प्रवाशांची गजबज असते. मात्र दुपारच्यावेळेत या बसस्थानकातही प्रवाशांची वर्दळ कमी झाली आहे. शाळा, महाविद्यालयांना सुटी पडल्याने विद्यार्थी, शिक्षकांची संख्या कमी होत आहे. त्यातच वाढत्या उन्हामुळे दुपारच्यावेळेत प्रवास करणे टाळले जात आहे. त्यामुळे परिवहनच्या महसुलावरही परिणाम होत आहे.
सकाळ-सायंकाळच्या सत्रातच प्रवासाला पसंती
विशेषत: सकाळ आणि सायंकाळच्या सत्रातच प्रवासाला पसंती दिली जात आहे. त्यामुळे लांब पल्ल्यासह स्थानिक बसेसना दुपारच्यावेळी प्रवासी मिळेनासे झाले आहेत. मध्यवर्ती बसस्थानकातून दररोज विविध मार्गावर 650 हून अधिक बसेस धावतात. सकाळच्या सत्रात सुरळीत बससेवा सुरू असली तरी दुपारी प्रवाशाविना फेऱ्या कमी कराव्या लागत आहेत. पुन्हा सायंकाळी बस सुरळीत होत आहे.
दुपारच्यावेळेत रिकामी गाड्या
ग्रामीण भागातून शहरात येणारे प्रवासीही सकाळच्या सत्रात येण्यास पसंती देत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील बसेसनाही दुपारच्यावेळेत प्रवाशांची प्रतीक्षा करावी लागत आहे. लग्नसराई आणि यात्रांमुळे नागरिक बाजारपेठेत येत आहेत. मात्र सकाळी आणि सायंकाळीच प्रवासासाठी बाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील बसेसही दुपारच्यावेळेत रिकामी फिरू लागल्या आहेत.









