विमानांची संख्या वाढविण्याची गरज
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव विमानतळावरील अनेक सेवा रद्द करण्यात आल्याने याचा फटका प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे प्रवासी संख्या कमालीची खालावत असल्याचे दिसून येत आहे. ऑक्टोबर महिन्यात 29 हजारांचा टप्पा गाठलेली प्रवासी संख्या नोव्हेंबरमध्ये 24 हजारांवर येऊन ठेपली. केवळ एका महिन्यात 5 हजार प्रवासी संख्या कमी झाल्याने चिंता व्यक्त केली जात असून, याचा परिणाम विमानसेवेशी संबंधित इतर व्यवसायांवर होत आहे.
बेळगावमधून देशातील महत्त्वाच्या शहरांना विमानसेवा सुरू असल्याने प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत होता. केवळ बेळगावच नाही तर कोकण, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील प्रवासीही बेळगावमधून ये-जा करीत होते. परंतु, राजकीय दबावाखाली काही विमानसेवा इतर शहरांना नेण्यात आल्याने बेळगावमधील अनेक सेवा बंद पडल्या. 80 टक्के प्रवासी असतानाही बेळगाव-बेंगळूर विमानफेरी रद्द करण्यात आली. या एका फेरीमुळे प्रवासी संख्या कमालीची घटली.
सध्या बेळगावमधून बेंगळूर, हैद्राबाद, दिल्ली, अहमदाबाद, मुंबई, नागपूर, जयपूर व तिरुपती या शहरांना सेवा सुरू आहेत. परंतु, यातील अनेक सेवा वरचेवर रद्द केल्या जात आहेत. याचा फटका प्रवासी सेवेला बसत आहे. ऑक्टोबर महिन्यात 430 विमानांची ये-जा होती. परंतु, नोव्हेंबरमध्ये ती 357 वर आली. विमानफेऱ्या कमी झाल्याने प्रवाशांची संख्या मंदावत आहे. त्यामुळे विमानांची संख्या वाढविण्याची गरज आहे.









