नेपाळमधींल पशुपतिनाथाचे मंदीर जगप्रसिद्ध आहे. ते भारतातील असंख्य हिंदूंचेही पवित्र तीर्थस्थळ आहे, ही माहिती जवळपास प्रत्येकाला असते. पण त्या मंदीराच्या प्रकारचे एक पशुपतिनाथ मंदीर भारतातही आहे, ही बाब अनेकांना ज्ञात नाही. राजस्थानातील नागौर जिल्ह्यात मांझवास या गावात हे मंदीर आहे. त्याची स्थापना योगी गणेशनाथ महाराज यांनी अनेक शतकांपूर्वी केली आहे. योगी गणेशनाथ महाराज हे नेपाळच्या राजघराण्याचे गुरु होते. त्यांच्या प्रेरणेने आणि नेपाळच्या पशुपतिनाथ मंदीराचे तत्कालीन महंत नरहरिनाथ यांच्या अनुमतीने या भारतातील पशुपतिनाथ मंदीराची स्थापना करण्यात आल्याचा इतिहास आहे.
येथील शिवलिंग अष्टधातूंपासून निर्माण करण्यात आले आहे. शिवलिंगाच्या चारी दिशांना भगवान महादेवांच्या मूर्ती स्थापित करण्यात आल्या आहेत. शिवलिंगाचे वजन 1,652 किलोग्रॅम इतके आहे. या शिवलिंगाची आणि शिवप्रतिमांची पूजा येथे प्रतिदिन चारवेळा केली जाते अशी माहिती विद्यमान महंत स्वरुपनाथ महाराज यांनी दिली. या मंदीरात पूजा करायची असेल तर वेषभूषा निर्धारित करण्यात आली आहे. पुरुषांसाठी धोतर-कुर्ता आणि साफा तर महिलांसाठी साडी किंवा राजस्थानी वेषभूषा अशी वेषभूषा आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
या तीर्थस्थळाचा समावेश 12 ज्योतिर्लिंगांमध्ये होत नाही. तथापि, आध्यात्मिक महत्वाच्या दृष्टीने त्याचे ऐतिहासिक स्थान आहे. त्याची स्थापना करण्यापूर्वी 121 कुंडीय यज्ञ करण्यात आले होते. तसेच येथे स्थापित शिवलिंगाची 12 ज्योतिर्लिंग यात्रा करण्यात आली होती. हजारो भाविक प्रतिवर्ष येथे पूजाआर्चा करतात.









