वृत्तसंस्था/नवी दिल्ली
मुंबई इंडियन्सने महिलांच्या प्रिमियर लीगसाठी पारुनिका सिसोदियाची जखमी अष्टपैलू पूजा वस्त्रकारच्या जागी निवड केली असल्याचे फ्रँचायझींनी गुरुवारी जाहीर केले. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरनेही मनगटी स्पिनर आशा सोभनाच्या जागी यष्टिरक्षक फलंदाज नुझहत परवीनला संघात स्थान दिले आहे. विद्यमान चॅम्पियन्स आरसीबी व गुजरात जायंट्स यांच्यातील सामन्यात आज शुक्रवारपासून डब्ल्यूपीएलला सुरुवात होत आहे. रेल्वेच्या परवीनने भारतातर्फे 5 टी-20 सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. 30 लाख या प्रारंभिक किमतीवर ती आरसीबीमध्ये सामील झाली आहे. डब्ल्यूपीएलच्या पहिल्या आवृत्तीत पारुनिका गुजरात जायंट्सकडून खेळली होती. पण या मोसमात ती मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसेल. अलीकडेच झालेल्या यू-19 महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत पारुनिकाने आपल्या डावखुऱ्या स्पिन गोलंदाजीचा जलवा दाखविला होता. उपांत्य फेरीत तिने सामनावीराचा बहुमानही मिळविला होता.









